शिवचरित्र घरी ठेऊन शिवविचार रक्तात उतरवावे : डॉ. मिलिंद कुलकर्णी

Edited by: दिपेश परब
Published on: August 21, 2023 16:19 PM
views 117  views

वेंगुर्ला : छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण हिंदुत्वाचा पुरस्कार करणार होते, बालपणी झालेल्या संस्कारातून त्यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न मावळ्यांच्या साथीने साकार केल. महाराजांचे हिंदुत्व सर्वसमावेशक होते. हिंदू धर्माची पताका सदैव फडकत राहण्यासाठी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला त्याला साडेतीनशे वर्ष होत आहेत. या अनुषंगाने शिवाजी महाराजांचा विचारांचा जागर करून ते विचार आचरणात आणून त्यानुसार कार्य केल्यास भारत विश्वगुरू बनेल, त्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरात अधिकृत शिवचरित्र ठेवायला हवे, त्याचे वाचन करून शिवविचार रक्तात उतरले पाहिजेत, त्याचप्रमाणे सहा जूनला प्रत्येकाने शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने हिंदू म्हणून एक धर्म पताका प्रत्येक घरी उभारली पाहिजे असे प्रतिपादन डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

       वेंगुर्ला नगर वाचनालय येथे हिंदू धर्माभिमानी आणि शिवप्रेमी नागरिक वेंगुर्ला यांच्या वतीने आयोजित केलेल्या 'शिवराज्याभिषेक ३५०, स्वराज्य व राष्ट्रनिर्माण' या विशेष कार्यक्रमात डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक हिंदू धर्मासाठी एक प्रेरणा देणारी घटना असून या शिवराज्यभिषेकाच्या अलौकिक घटनेतून छत्रपती संभाजी महाराज व त्यांच्या पुढील वारसांनी सैदव राष्ट्र उभारणीचं आणि हिंदू समाजाला जागे ठेवण्याचे काम केलं याचे मूळ या शिवराज्यभिषेकांमध्ये आहे.आज आपला हिंदू समाज काहीसा निद्रिस्त असून त्याला एकत्र आणण्यासाठी शिवाजी महाराजांचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार अंगीकारणे आवश्यक आहेत असे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले. डॉ. कुलकर्णी यांनी अनेक लेखकांचे संदर्भ देत शिवविचार अगदी प्रखरपणे मांडत उपस्थितांची मने जिंकली.

       या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबुराव खवणेकर यांनी केले. वक्ता परिचय प्रा.सचिन परूळकर यांनी तर मान्यवरांचे स्वागत ॲड.सूर्यकांत प्रभुखानोलकर आणि अरुण गोगटे यांनी केले,तर आभार प्रदर्शन गुरुप्रसाद खानोलकर यांनी मानले.या उद्बोधन वर्गास मोठ्या प्रमाणत हिंदू धर्माभिमानी आणि शिवप्रेमी उपस्थित होते.