
सावंतवाडी : जनमानसांमध्ये शिवविचारांची जागृतता होणे ही काळाची गरज आहे. समाजात वाहत असलेल्या अपप्रवृत्तींना आळा घालवायचे सामर्थ्य शिवचरित्रामध्ये आहे. म्हणूनच मातृभूमी शिक्षण संस्थेने 'शिवसंस्कार' हा उपक्रम हाती घेतला आहे. आज इंग्रजी माध्यम जरी अपरिहार्य वाटत असले तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी आचार विचारांचे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जाज्वल्य धर्माभिमानाचे अमृत हेच येणाऱ्या पिढीसाठी संजीवनी ठरणार आहे. त्यादृष्टीने शिवसंस्कारच्या माध्यमातून विविध ऐतिहासिक उपक्रमांचे राज्यस्तरीय व आंतरराज्यस्तरीय आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये दरवर्षी शिवचरित्रावर आधारीत शंभर मार्कचा लेखी पेपर इयत्ता ५ वी ते इयत्ता ८ वींच्या मुलांसाठी गेली पाच वर्षे संस्था घेत आहे. शिवचरित्र घरोघरांत पोहोचावे, पालक व मुलांनी ते आत्मसात करावे, या हेतूने हे आयोजन केले जाते.
या उपक्रमाबरोबरच इतिहासातील प्रत्येक घटनेला उजाळा देत ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धा, निबंधस्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पोवाडा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वाचन स्पर्धा, नाटय, चित्रकला स्पर्धा इत्यादी स्पर्धा वर्षभर घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर दांडपट्टा, तलवारबाजी, ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन हे उपक्रम देखील राबविण्यात येणार आहेत. तरी तमाम शिवभक्तांनी बहुसंख्येने 'शिवसंस्कार' मध्ये सामील व्हावे, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा. डॉ. सोनल लेले व 'शिवसंस्कार' चे कार्याध्यक्ष गणेश ठाकूर यांनी केले आहे.
दि. १२ जानेवारी २०२३ रोजी राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती असून त्यानिमित्ताने राज्यस्तरीय व आंतरराज्यीय ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा
जिजाऊ माँसाहेब वेशभूषा स्पर्धा आहे. यासाठी पात्रता पुढीलप्रमाणे आहे-
१. शिशुगट- वय ३ ते ५ वर्षे
२. छोटागट - वय ६ ते १० वर्षे
३. मोठागट - वय ११ ते १५ वर्षे
४. खुलागट - १६ वर्षांपासून पुढे.
ही स्पर्धा ऑनलाईन असून, जास्तीत जास्त दोन मिनिटांचा व्हिडीओ करून ९६०७८२७२७६ या नंबरवर दि. ५ जानेवारी २०२३ पर्यंत पाठवायचा आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला आपले नाव, वय, गाव व वेषभूषेबद्दल माहिती सांगणे अपरिहार्य आहे. वेळमर्यादा ओलांडल्यास व ५ जानेवारी या तारखेनंतर व्हिडिओ आल्यास ते सर्व नियमबाह्य ठरवण्यात येतील.
सहभागी राज्य - महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात.
स्पर्धा फी रुपये ५०/- फक्त.
यात राज्यस्तरीय व आंतराज्यीय क्रमांककाढले जातील. अंतिम निर्णय संस्थेकडे राहील.
तसेच छत्रपती शिवचरित्र स्पर्धा परीक्षा २०२२-२३ सिंधुदुर्ग जिल्हा ही रविवार दि. १ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत होणार आहे, असे आयोजकांनी कळविले आहे.