'त्या' आंदोलनाला उबाठा शिवसेनेचा पाठिंबा : वैभव नाईक

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: October 11, 2025 16:56 PM
views 334  views

कणकवली : एसटी कामगारांची वेतनवाढ व भत्ते यामधील प्रलंबित असलेला आर्थिक फरक मिळावा या मागणीसाठी १३ ऑक्टोबरपासून एसटी महामंडळ संयुक्त कृती समितीमार्फत तीव्र स्वरूपाचे राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माजी आमदार वैभव नाईक यांनी पाठिंबा जाहीर केला असून सिंधुदुर्ग शिवसेना एसटी कामगार सेनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन वैभव नाईक यांनी केले आहे.

१ एप्रिल २०१६ ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीच्या वार्षिक वेतनवाढच्या १ टक्के वाढीव दर आणि घरभाडे भत्त्याची वाढीव दराची थकबाकी मिळावी, सन २०१८ पासुन प्रलंबित महागाई भत्त्याचा फरक, १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२४ या चार वर्षाचा ६ हजार ५०० रुपये वेतनवाढीचा प्रलंबित फरक, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे ५५ टक्के महागाई भत्ता, घरभाडे भत्ता दर १०, २०, ३० टक्के दराने लागू करा, १५ हजार रुपये दिवाळी भेट, १२ हजार ५०० रुपये सण उचल,कंत्राटी नोकरभरती रद्द करून नियमित नोकरभरती प्रक्रिया राबविण्यात यावी, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कामगारांचे वेतन करण्यात यावे, संपूर्ण थकबाकीची रक्कम एकरकमी अदा करण्यात यावी, निवृत्त कर्मचाऱ्यांना १ वर्षाचा मोफत पास,सेवानिवृत्त कामगारांची थकीत देणी एकरकमी देण्यात यावी, पीपीपी तत्वावर महामंडळाच्या जागांचे विकास करण्याऐवजी महामंडळाने सदर जागा स्वतः विकसित कराव्यात अशा विविध एसटी कामगार हिताच्या मागण्यांसाठी एसटी महामंडळ संयुक्त कृती समितीतर्फे हे आंदोलन छेडण्यात येणार आहे.