तेलींच्या टार्गेटवर मंत्री दीपक केसरकर !

सावंतवाडीत धुसफूस, केसरकरांसमोर भाजपचच आव्हान
Edited by: विनायक गांवस
Published on: February 16, 2023 13:48 PM
views 305  views

सावंतवाडी : वैश्य भवन येथील मेळावा, भाजप कार्यालयातील भाजी मंडई व आठवडा बाजार संदर्भातील पत्रकार परिषदेत मंत्री दीपक केसरकर यांच्यावर केलेल्या टोलेबाजीनंतर बुधवारी केसरकरांच्या होम पीचवर झालेल्या भाजप जिल्हा कार्यकारिणी बैठकीत मंत्री केसरकरांना विचारून त्यांचं मत घेऊन भाजप लोकसभेचा उमेदवार ठरवणार नसल्याच वक्तव्य जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केल. त्यामुळे सावंतवाडी मतदारसंघात भाजप व बाळासाहेबांच्या शिवसेनेत सर्व काही आलबेल नसुन धुसफूस सुरू असल्याचं पुन्हा एकदा दिसून येतं आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतील मैत्रीपूर्ण लढत, सावंतवाडी खरेदी- विक्री संघात पडलेल्या फूटीनंतर भाजपच्या कार्यकारीणीत आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा व लोकसभा निवडणूका भाजपने स्वबळावर लढण्याचा नारा दिल्यानं भाजपला पर्यायानं राजन तेलींना प्रतिस्पर्धी ठरणाऱ्या मंत्री दीपक केसरकर व त्यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेसमोरच मित्र पक्षानंच आव्हान उभं केलय. त्यामळे निवडणुकांआधीच दोन बलाढ्य मित्रपक्षात शितयुद्धाला सुरूवात झालीय. 


सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आमदारकीसाठी दीपक केसरकर विरूद्ध राजन तेली यांच्यातील स्पर्धेत केसरकरांनी आजवर बाजी मारलीय. २०१९ ला भाजपच्या ताकदीवर अपक्ष राहिलेल्या तेलींमुळे केसरकरांच्या मताधिक्यात घट झाली. त्यामुळे २०२४ साठी आतापासूनच तेलींनी जोरदार तयारी सुरू केलीय. यातच बुधवारी केसरकरांच्या होम पीचवर झालेल्या भाजप कार्यकारिणी बैठकीत आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा या सर्व निवडणुका भाजप शत प्रतिशत लढणार आहे आणि शंभर टक्के जिंकणार आहे. २०२४ हे आमचे मिशन आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपने निवडणूक लढवण्याच्यादृष्टीने तयारी केली आहे. या मतदारसंघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पक्षाने उमेदवारी दिल्यास सर्वांना त्याचा आनंदच होईल आणि निश्चितपणे आम्ही एकतर्फी निवडणूक जिंकू असा विश्वास राजन तेलींनी व्यक्त केला. लोकसभा मतदारसंघात भाजप निवडणूक लढणार असून मतदारसंघात अजून कोणीही उमेदवार ठरला नाहीय. परंतु जर केंद्रीय मंत्री राणे यांना पक्षाने उमेदवारी दिल्यास निश्चितपणे राणे हे एकतर्फी विजयी होतील. भाजप लोकसभा निवडणुकीत कोणाला उमेदवारी द्यावी, याबाबत केसरकर यांचे मत घेणार नाही असा खोचक टोला तेलींनी हाणलाय. 


तर, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा या सर्व निवडणुका भाजप स्वबळावर लढणार आहे. तशी तयारी आतापासूनच आम्ही केल्याचा सुतोवाच त्यांनी

भाजपची जिल्हा कार्यकारिणी बैठकीत केला‌. यावेळी आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे सावंत-भोंसले, अशोक सावंत, प्रभाकर सावंत, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब, महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, शहर मंडलचे मोहीनी मडगावकर, रविंद्र मडगावकर, अजय गोंदावळे, महेश धुरी आदी पदाधिकारी उपस्थित होते. 


एकंदरीत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावर तिन दिवसांत तिसऱ्यांदा टीका केल्यानंतर देखील केसरकर समर्थकांकडून अर्थात बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून चकार शब्दही काढला गेला नाहीय. तेलींच्या टिकेला उत्तर दिल नाहीय. त्यामुळे सत्तेत एकत्र असणाऱ्या केसरकर व भाजपा युतीत नक्की चाललंय काय ? असा सवाल सर्वसामान्यांना पडू लागला असून तेली- केसरकरांमधील हे शित युद्ध ऐन निवडणुकीच्या तोंडावर वरिष्ठांच्या आदेशानं क्षमणार की भाजप व बाळासाहेबांची शिवसेना एकमेकांच्याच विरुद्ध उभे ठाकणार ? हे पहावं लागेल.