
सावंतवाडी : शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या होमपीचवर शनिवारी दु. १२ वा. शिवसेना पदाधिकारी मेळावा होत आहे. शिवसेना रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा संपर्क प्रमुख आ. रवींद्र फाटक या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची देखील मेळाव्याला प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात शिवसेनेकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. ठाकरे गटानं दिलेल्या आव्हानामुळे हा मेळावा यशस्वी करून दाखवण्यासाठी केसरकर समर्थकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
माजी मंत्री, ठाकरे सेनेचे नेते सुभाष देसाई, शिवगर्जना यात्रेनिमित्त सावंतवाडीत आले असताना मंत्री केसरकरांवर सडकून टीका केली होती. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी केसरकरांवर तोंडसुख घेतले होते. युवा नेते आदीत्य ठाकरेंच्या गांधी चौक येथील सभेनंतर उत्तर देण्यासाठी मेळावा घेणार असल्याच जाहीर करुन ९ महिने झाल्यानंतर देखील केसरकरांना मेळावा घेता आला नाही, असा टोला हाणला होता. यातच रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा संपर्क प्रमुखपदी निवड झाल्यानंतर आ. रवींद्र फाटक पहिल्यांदाच सावंतवाडीत येत आहेत. १२ वा. रवींद्र मंगल कार्यालय येथे हा पदाधिकारी मेळावा पार पडणार आहे.
यावेळी मंत्री केसरकर यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय रविंद्र फाटक काय बोलणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. या पदाधिकारी मेळाव्या निमित्त शिवसेनेकडून शहरात चौकाचौकात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची ताकद ठाकरे गटाला दाखवून देत हा मेळावा यशस्वी करण्यास केसरकर समर्थकांची जय्यत तयारी सुरू आहे.