
दोडामार्ग : तुम्ही विद्यार्थ्यांनी जे प्रावीण्य मिळविले आहे ते खरोखर स्तुत्य असून तुमचे सर्वांचे आमच्या पक्षाचे आमदार दीपक केसरकर व शिवसेना पक्षाच्यावतीने अभिनंदन करत आहोत. तुमच्या पुढील शैक्षणिक वाटचालीत अजून मोठे यश संपादन करावे आमचा शिवसेना पक्ष नेहमी तुमच्या सोबत असेल अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष संजू परब यांनी दिली.
आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी व बारावी मधील गुणवंत झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा शिवसेनेच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी परब बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सावंतवाडी विधानसभा मतदार संघ प्रमुख प्रेमानंद देसाई, तालुकाध्यक्ष गणेशप्रसाद गवस, युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस, उपतालुकाप्रमुख तिलकांचन गवस, सेवानिवृत्त मुख्याध्यापक संतोष घोगळे, कोलझर सरपंच सेजल गवस, आयनोडे सरगवे पुनर्वसन सरपंच श्रद्धा देसाई, विभागप्रमुख बबलू पांगम, तालुका संघटक गोपाळ गवस, महिला तालुकाप्रमुख चेतना गडेकर, यांसह नंदू टोपले, रामदास मेस्त्री, सूर्यकांत गवस, संदीप गवस, विनायक शेटये, मायकल लोबो, मनिषा गवस, लक्ष्मी करमळकर, हर्षा टोपले, लाडू आयनोडकर आदी उपस्थित होते.
परब पुढे म्हणाले की, आमच्या मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर हे नेहमी आपल्या विद्यार्थ्यांचा विचार करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत असतात. यापुढेही त्यांचे कार्य असेच शिवसेनेच्या माध्यमातून सुरूच राहणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना ही यश प्राप्त केले आहे त्यांनी असेच आपल्या शैक्षणिक कारकीर्दीत पुढे जात रहावे व आपल्या तालुक्याचे जिल्ह्याचे नाव उज्वल करावे असे आवाहन देखील संजू परब यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. तसेच प्रेमानंद देसाई, गणेशप्रसाद गवस, तिलकांचन गवस, संतोष घोगळे तसेच पालक तथा मोर्ले गावाचे माजी सरपंच सुजाता मणेरीकर यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ गवस यांनी केले. विद्यार्थ्यांची व पालकांची मोठी उपस्थीती या कार्यक्रमाला होती.