सावंतवाडीच्या शिवसेना नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन

गटनेतेपदी बाबू कुडतरकर
Edited by: विनायक गांवस
Published on: January 06, 2026 13:22 PM
views 197  views

सावंतवाडी : नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या सातही नगरसेवकांनी आज सिंधुदुर्गनगरी येथे  नगरविकास अधिकारी विनायक औतकर यांच्याकडे नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र गट स्थापन केला. भाजपाने या आधीच नगराध्यक्षा श्रद्धाराजे सावंत भोंसले यांच्या अध्यक्षतेखाली गट स्थापन केला आहे. एकूणच दोन्ही पक्षाकडून गटस्थापन केल्यानंतर आता उपनगराध्यक्ष आणि विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीबाबत हालचाली पाहायला मिळणार आहेत.

सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपा विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळाली होती. या लढतीमध्ये नगराध्यक्षपदी भाजपाच्या युवराज्ञी श्रद्धाराजे सावंत भोंसले यांच्यासह भाजपाचे 11 नगरसेवक निवडून आले होते. तर शिवसेनेचे 7 नगरसेवक निवडून आले. तर काँग्रेस आणि ठाकरे शिवसेना यांचा प्रत्येकी एक नगरसेवक निवडून आला. केंद्रात तसेच राज्यात महायुतीचे सरकार असल्याने जिल्ह्यातील नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये महायुती होण्याची शक्यता आहे. परंतु, युती न झाल्यास या ठिकाणी उपनगराध्यक्षपदासाठी निवडणूक पाहायला मिळणार आहे.

एकूणच याच पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाकडून आपापल्या नगरसेवकांचे स्वतंत्र गट स्थापन केलेत. भाजपकडे आवश्यक संख्याबळ असल्याने उपनगराध्यक्ष पद हे भाजपकडेच जाणार आहे. परंतु, आयत्यावेळी काही गडबड नको यासाठी गटस्थापन करण्यासाठी दोन्ही पक्षाकडून पुढाकार घेण्यात आला.