...तर रस्ता रोको आंदोलन

हत्ती पकडसाठी शिवसेना आक्रमक
Edited by: लवू परब
Published on: February 13, 2026 20:14 PM
views 13  views

दोडामार्ग :  दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा वाढता वावर थेट घरांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला असून हत्तींचे आता माणसांवरील हल्ले वाढत चालले आहेत. त्यामुळे तात्काळ हत्ती पकड मोहीम राबवली नाही तर रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचा गंभीर आरोप करत वनविभागाच्या निष्क्रिय भूमिकेविरोधात तीव्र संताप व्यक्त आला.

घोटगे गाव परिसरात मागील दीड ते दोन महिन्यांपासून ‘गणेश’ नावाने ओळखला जाणारा टस्कर आणि त्याच्यासोबत सहा हत्तींचा कळप वावरत आहे. काजूचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी कुटुंबासह बागांमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत आहेत. मात्र हत्तींच्या सततच्या हालचालीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे सावट आहे. बुधवारी भरत दळवी हे आपल्या आई-वडील, पत्नी, मुले आणि महिला कामगारांसह नेहमीप्रमाणे काजू वेचत होते. दुपारच्या सुमारास अचानक झाडीत आवाज ऐकू आला. काही क्षणांतच गणेश टस्कर पुढे आणि त्यामागे सहा हत्तींचा कळप समोर येऊन उभा ठाकला. जीवाच्या भीतीने सर्वांनी आरडाओरडा करत वेगवेगळ्या दिशांनी पळ काढला. मात्र  यामध्ये दोन महिला जखमी झाल्यात तर एक शेतकरी बालंबाल बचावले. तसेच मागील अनेक महिन्यांपासून हत्तींची दहशत तालुक्यात सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर आज दोडामार्ग शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दोडामार्ग वनविभागाला धडक देत दोडामार्ग वनक्षेत्रपाल संभाजी पाटील यांना जाब विचारला.  यावेळी पंचायत समिती सदस्य तथा शिवसेना तालुकाप्रमुख  गणेशप्रसाद गवस,  शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, पंचायत समिती सदस्य स्नेहा गवस, तालुका संघटक गोपाळ गवस, सुनील गवस, विशांत तळवडेकर, भगवान गवस, रामदास मेस्त्री, सज्जन धाऊस्कर, लाडू आयनोडकर, दत्ताराम देसाई, श्रीनिवास शेटकर आदी उपस्थित होते. 

माणसाच्या मृत्यूची वाट पाहताय का ? – गणेशप्रसाद गवस 

स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागावर गंभीर आरोप करत वरिष्ठ अधिकारी केवळ एसी कार्यालयात बसून परिस्थितीकडे दुर्लक्ष करत आहेत. एखाद्याचा जीव गेला तर जबाबदार कोण राहणार ? असा सवाल विचारला. वनविभागाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोडामार्गात येऊन प्रत्यक्ष पाहणी करावी अशी मागणी करण्यात आली. हत्ती दोडामार्गात आहेत आणि बैठका सावंतवाडीत घेतल्या जात आहेत हे चालणार नाही. उपवनसंरक्षक यांनी दोडामार्ग तालुक्यातील हत्ती बाधित गावातील ग्रामस्थांशी संवाद साधावा असे पदाधिकाऱ्यांकडून सुचविण्याता आले. तसेच तात्काळ हत्ती पकड मोहीम राबवली नाही तर रस्ता रोको आंदोलनासह तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. 

काजूबागांचे नुकसान

दोडामार्ग तालुका काजूसाठी ओळखला जातो. हत्ती बागांमध्ये घुसून काजू, फणस, केळी व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. नुकसानभरपाई ही तुटपुंजी असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.त्यामुळे ही नुकसान भरपाई वाढवून मिळावी यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करा अशीही मागणी यावेळी करण्यात आली.