
वेंगुर्ले : शिरोडा वेळावर येथे ग्रामपंचायत मार्फत नेमण्यात आलेल्या लाईफ गार्ड संजय नार्वेकर यांच्या प्रसंगावधानामुळे 2 पर्यटक महिलांना समद्रात बुडताना वाचविण्यात यश आले आहे. याबाबत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सध्या दिवाळीची सुट्टी व त्यात रविवार आल्याने शिरोडा वेळावर समुद्र किनाऱ्यावर पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक दाखल झाले होते. यावेळी गडहिंग्लज येथील रहिवासी रेखा बेसुरे (४५) व स्वाती बेसुरे (२१) या दोन महिलांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या बुडू लागल्या. ही बाब लक्षात येताच याठिकाणी ग्रामपंचायत मार्फत नेमलेल्या लाईफ गार्ड संजय नार्वेकर यांनी तात्काळ समुद्रात जात या दोन महिलांचे प्राण वाचवले.
वाढते पर्यटक व अपघात रोखण्यासाठी शिरोडा ग्रामपंचायतद्वारे अजून एक लाईफ गार्ड लवकरच नियुक्त करण्याचा निर्णय झालेला आहे. समुद्र किनारी वाढते अपघात रोखण्यासाठी व पर्यटकांना योग्य सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत सर्व स्तरावर प्रयत्नशील असून पर्यटकांनी शिरोडा ग्रामपंचायत व शिरोडा पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन सरपंच मनोज उगवेकर यांनी केले आहे.