पालकमंत्र्यांच्या आदेशानं शिरोडा बाजारपेठ रस्त्याचं काम सुरू

Edited by: दिपेश परब
Published on: February 21, 2025 14:44 PM
views 561  views

वेंगुर्ला : शिरोडा बाजारपेठेतुन जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे रखडलेले काम पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशाने काम सुरू करण्यात आले आहे. याबाबत येथील ग्रामस्थांची वारंवार मागणी होती. जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या माध्यमातून या रस्त्याचे काम होण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. 

वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा हे गाव पर्यटनदृष्ट्‌या विकसित होत असून बऱ्याच मोठ्या प्रमाणावर या गावालगत असलेल्या विस्तीर्ण समुद्र किनाऱ्यास व पर्यटन क्षेत्रास पर्यटकांची सतत ये-जा होत असते. तसेच येथील श्री देवी माऊली मंदिरात अनेक वर्षानंतर ४ मार्च पासून सहस्त्र चंडी महायज्ञ कार्यक्रम होत आहे यानिमित्त लाखो भाविक शिरोडा येथे दाखल होणार आहेत. मात्र जिल्हा मार्ग क्र.६४ 'अ' शिरोडा तिठा ते बाजारपेठ मार्गे रस्ता पूर्णतः वाहतुकीस अयोग्य झाल्यामुळे याचा त्रास भाविकांना तसेच पर्यटकांना होणार आहे. यामुळे या रस्त्याचे काम मंदिरातील धार्मिक कार्यक्रमापूर्वी व्हावे अशी मागणी जि. प. माजी सभापती प्रितेश राऊळ, विश्वस्त अशोक परब, शिरोडा माजी उपसरपंच राहुल गावडे, माजी सदस्य अमित गावडे यांनी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या माध्यमातून पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली होती. 

    या मागणीची तात्काळ दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशाने या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. गेली २ ते ३ वर्ष हा रस्ता नादुरुस्त होता. ग्रामस्थांच्या मागणीची तात्काळ दखल घेतल्याबद्द जनतेतून समाधान व्यक्त होत असून पालकमंत्री नितेश राणे यांचे ग्रामस्थांतून आभार व्यक्त करण्यात आले आहेत.