शिरगाव हायस्कूलच्या १९७४-७५ बॅचचा स्नेहमेळावा

पन्नास वर्षांच्या आठवणींना उजाळा
Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 25, 2025 19:18 PM
views 48  views

देवगड : देवगड तालुक्यातील शिरगाव येथील शिरगाव हायस्कूलमध्ये १९७४-७५ बॅचचा स्नेहमेळावा २१ मे २०२५ रोजी आयोजित करण्यात आला होता.त्यामुळे या शाळेच्या पन्नास वर्षांच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.शाळा म्हणजे केवळ शिक्षण देणारी संस्था नव्हे,तर ती एक भावना असते,जी आयुष्यभर मनाच्या कप्प्यात जपली जाते.याच भावनेचा प्रत्यय यामुळे आला आहे. 

शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात,जेव्हा १९७४-७५ या एस.एस.सी. बॅचचा स्नेहमेळावा शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.तब्बल पन्नास वर्षांनंतर २२ माजी विद्यार्थी पुन्हा आपल्या बालपणीच्या आठवणी घेऊन एकत्र आले.या कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक अध्यक्ष पुंडलिक अंबाजी कार्ले साहेब यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली. यानंतर सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन करून वातावरणाला एक आध्यात्मिक आणि भावनिक स्पर्श मिळाला.

या सोहळ्याला विशेष रूप दिलं ते शाळेचे जेष्ठ शिक्षक गणित विषयाचे जे. जी. पाटील सर, जे आजही आपल्या जुने विद्यार्थी प्रेमाने ओळखतात.त्यांनी आपल्या भाषणात ५० वर्षांपूर्वीच्या आठवणी उलगडत सांगितले, “समाज घडविताना सकारात्मकतेची साथ सोडू नका. आपण आदर्श ठरलो तरच पुढची पिढी घडेल.”शाळेचे चेअरमन विजयकुमार कदम सर, मानद अधीक्षक संदीप साटम, कार्यकारिणी सदस्य हेमंत देसाई आणि मुख्याध्यापक एस. एन. आत्तार सर यांनी उपस्थित राहून या सोहळ्याला शुभेच्छा दिल्या.

या बॅचचे प्रमुख सदस्य ज्ञानदेव लब्दे, प्रकाश धोपटे आणि घनश्याम इंदप यांनी पुढाकार घेत हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वतः घनश्याम इंदप यांनी तर आभार प्रदर्शन कृष्णा चव्हाण यांनी केले.या स्नेहमेळाव्याची विशेष बाब म्हणजे या बॅचने शाळेच्या नूतनीकरणासाठी १ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश संस्थेकडे सुपूर्त केला.ही केवळ आर्थिक मदत नव्हे, तर शाळेबद्दल असलेल्या ऋणभावनेची आणि कृतज्ञतेची सुंदर अभिव्यक्ती होती.

यावेळी भिकाजी राणे, विजय लाड, एन. टी. राणे, पांडु साटम, जोईल सर, जांभळे सर, श्रीमती तावडे आणि इतर अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर जुन्या आठवणींचा आनंद, शाळेबद्दलचा अभिमान आणि एकमेकांबद्दलचा जिव्हाळा दिसत होता.हा स्नेहमेळावा म्हणजे एका पिढीचा, एका काळाचा,आणि एका शाळेच्या संस्कारांचा जिवंत दस्तऐवज होता.पन्नास वर्षांनंतरही शाळेच्या मातीशी असलेली नाळ टिकवून ठेवणं, हेच या बॅचचं खऱ्या अर्थाने यश म्हणावं लागेल. शाळा बदलते, वेळ बदलतो, पण शिक्षकांच्या शिकवणीचा, मैत्रीच्या गाठींचा आणि शाळेच्या प्रत्येक कोपऱ्यात दडलेल्या आठवणींचा गंध मनात कायम राहतो