
सावंतवाडी : शिंदे-फडणवीस सरकार स्थापनेनंतर कोकणात भाजप व बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात पहिली युती झाली ती सिंधुदुर्गात. ह्या युतीचं निमित्त होतं ते सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघाच. अन् या युतीचे शिल्पकार होते ते भाजप नेते महेश सारंग. ग्रामपंचायत निवडणुकीत सुद्धा अगदी शेवटच्या क्षणी ही युती कायम राहीली. युतीची घोषणा नेत्यांनी अगदी अंतीम टप्प्यात केली. परंतु, ज्या महेश सारंग यांच्या पुढाकारानं सावंतवाडीत युती झाली त्याच सारंग यांच्या कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात बाळासाहेबांच्या शिवसेनेनं युती धर्म पाळला नाही. कारिवडे, कुणकेरीत गाव विकास पॅनल उभ करत मैत्रीपूर्ण लढतीसाठी त्यांनी भाजपला आव्हान दिलं आहे. तर आंबेगावमध्ये युती एकत्रित लढत आहे. याठिकाणचे जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका संघटक आहेत. त्यात कोलगाव मतदारसंघातच युती धर्माला हरताळ फासल्यानं येथील भाजप कार्यकर्त्यांत शिंदे गटा विरूद्ध रोष पहायला मिळत आहे. ज्या महेश सारंग यांनी युतीसाठी पुढाकार घेतला त्यांच्या मतदारसंघात युती धर्म निभावला न गेल्यान भाजप कार्यकर्ते नाराज झालेत. परंतु, या दोन्ही गावात भाजपच्या दोन्ही सरपंचांसह पॅनलचा एकतर्फी विजय निश्चित असल्याचा दावा देखील भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. युती धर्म न पाळणाऱ्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला एकप्रकारे खुलं आव्हानच भाजपने दिल आहे. यातच आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूका तोंडावर आहेत. ग्रामपंचायतीत न झालेल्या युतीचा परिणाम हा निश्चितच या निवडणुकांत होणार असल्यानं बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते दीपक केसरकर आता यावर कोणती भुमिका घेणार ? तर युती धर्म न पाळणाऱ्या शिंदे गटाला या गावातील भाजप आपला इंगा कसा दाखवणार ? हे पहावं लागणार आहे.