शेखर निकमांना दीडपट मताधिक्य मिळेल : उदय सामंत

Edited by: मनोज पवार
Published on: November 05, 2024 20:09 PM
views 308  views

चिपळूण : तुम्ही केलेली विकास कामे व शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण यांची साथ यामुळे मागील निवडणुकीपेक्षा यावेळी दीडपट जास्त मताधिक्य असेल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री तथा पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी महायुतीचे उमेदवार आमदार शेखर निकम यांच्या प्रचारार्थ आयोजित पोफळी येथील सभेत व्यक्त केला. 

या सभेच्या माध्यमातून पोफळी जिल्हा परिषद गटात निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात आले.  यावेळी व्यासपीठावर महायुतीचे उमेदवार आमदार शेखर निकम यांच्यासह माजी आमदार सदानंद चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी सभापती शौकत मुकादम, प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते, ज्येष्ठ नेते जिल्हा नियोजन मंडळ सदस्य दादा साळवी,  माजी पंचायत समिती सदस्य बाबू साळवी, चिपळूण तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, भाजप चिपळूण तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, आरपीआय (आठवले गटाचे) प्रदेश संघटक संदेश मोहिते, प्रदेश उपाध्यक्ष सचिन मोहिते, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. दिशा दाभोळकर, भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ. चित्रा चव्हाण, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुरेखा खेराडे, भाजप चिपळूण तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, माजी उपसभापती सूर्यकांत खेतले, शिरगाव सोसायटी चेअरमन जयंतराव शिंदे, कोंडफनसवणे माजी सरपंच मधुकर इंदुलकर, ज्येष्ठ नेते किसन पवार, डॉ. शिवाजी मानकर,  राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तालुकाध्यक्षा सौ. जागृती शिंदे, शिवसेना युवासेना तालुका अधिकारी निहार कोवळे, शिरगावचे माजी सरपंच अनिल शिंदे, पोफळी सरपंच उस्मान सय्यद, माजी उपसरपंच अब्दुला सय्यद, पोफळी ग्रामपंचायत सदस्य संजय बामणे, कुंभार्ली सरपंच रवींद्र सकपाळ, मुंडे सरपंच मयूर खेतले, पोफळी ग्रामपंचायत माजी सदस्य रवींद्र पंडव, सुरेश घाणेकर, इब्राहिम सय्यद आदी उपस्थित होते.

यावेळी ना. उदय सामंत पुढे म्हणाले की, महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांनी गेल्या वर्षात ज्या पद्धतीने  चिपळूण- संगमेश्वरवासींयांची सेवा केली आहे. ते पाहता मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीचे कुटुंब  मानून काम केलं आहे. तुम्ही केलेली कामे पाहता विजय तुमचा निश्चित आहे. आजच्या सभेची गर्दी बघितल्यानंतर तुम्ही सर्व जाती- धर्माच्या लोकांना सोबत घेऊन सामाजिक सलोखा जोपासला आहे.  तुम्ही चिपळूण- संगमेश्वरचा प्रामाणिकपणे विकास करण्याचा प्रयत्न केला आहे, अशा शब्दात महायुतीचे उमेदवार निकम यांचे कौतुक केले.


ते आणखी पुढे म्हणाले की, तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुती विरोधात खोटा प्रचार करण्यात आला. केंद्रात  महायुतीचे सरकार आले तर संविधान बदलले जाईल, मुस्लिमाना देश सोडून जावे लागेल, असा फेक नॅरेटिव्ह पसरवण्यात आला. त्याच्यावर अनेकांनी विश्वास ठेवला. मात्र, उबाठावाल्यांनी मुस्लिम बांधव- भगिनींची मते आपल्याला मिळाली, असे आजपर्यंत सांगितलेले नाही.  तर दुसरीकडे राज्यात महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणताना एका जाती - धर्मासाठी आणली नाही. तर ती सर्वांचसाठी आणली.  या योजनेचा राज्यातील महिलांना  लाभ मिळाला असून अन्य योजना सर्वच गटांसाठी आणल्या असून महाराष्ट्र राज्य योजनांमध्ये अग्रेसर ठरले आहे, असे ना. सामंत यांनी सांगितले.


महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करताना गाफील राहून चालणार नाही.  नाहीतर मताधिक्यात घट होऊ शकते. शेखर निकम राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढत असले तरी ते महायुतीचे म्हणून उमेदवार आहेत.  हे लक्षात घेऊन महायुतीच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांना मागील निवडणुकीपेक्षा दीडपट  मताधिक्य कसे मिळेल?  यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

अदृश्य शक्ती सोबत ठेवा- सदानंद चव्हाण

शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी आपल्या मनोगतात राज्यात महायुतीचे सरकार आले पाहिजे. महायुतीचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. आमदार शेखर निकम निवडून आले पाहिजेत. याचबरोबर निकम यांच्यासाठी पोफळी पंचायत समिती गणातून गेल्यावेळेपेक्षा मताधिक्य दुप्पट मिळायला हवे, असे आवाहन करताना निकम यांच्या सोबत गेल्या निवडणुकीत अदृश्य शक्ती सोबत होती. ती कला तुम्हाला जमते असे सांगताना तीच शक्ती यावेळी सोबत ठेवा, असा सल्ला चव्हाण यांनी निकम यांना दिला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम,भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ. चित्रा चव्हाण, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सौ. सुरेखा खेराडे, मुंढे सरपंच मयूर खेतले आदींनी आपली मनोगते व्यक्त करतांना निकम यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

कोयना प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे गरजेचे : बाबू साळवी

 तर पोफळी पंचायत समिती गणाचे माजी पंचायत समिती सदस्य बाबू साळवी यांनी पोफळी पंचक्रोशीतील कोयना प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे ना. उदय सामंत यांना आवाहन केले. यावर ना. सामंत यांनी निवडणूक संपल्यानंतर दोनच महिन्यात हा प्रश्न निकाली निघेल, अशी ग्वाही देताना तुम्हाला पाठपुरावा करावा लागणार नाही, असा विश्वास दिला. ही सभा यशस्वी करण्यासाठी पोफळी पंचायत समिती गणाचे माजी सदस्य बाबू साळवी यांच्यासह महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.