
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या नवीन मुलींच्या वसतिगृहात (New Girls Hostel) पिण्याच्या पाण्याचा अभाव, गळकी टाकी, अस्वच्छतागृहे, तुटलेली पाइपलाइन, वीजपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधांच्या अभावामुळे विद्यार्थिनींनी केलेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने उच्चस्तरीय आमदार समिती गठीत केली आहे. या संदर्भात विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी प्रश्न उपस्थित करत परिस्थितीची सखोल चौकशी करावी व सुधारणा कराव्यात, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर ही समिती जाहीर करण्यात आली.
या पाहणी समितीमध्ये विधान परिषदेचे सदस्य प्रविण दरेकर (अध्यक्ष), अनील परब, निरंजन डावखरे, नीलम गोर्हे, मनिषा कायंदे, तसेच विधानसभेचे सदस्य सुनील प्रभू, मंगेश कुडाळकर, शेखर निकम यांचा समावेश आहे. तसेच उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक हे समन्वयक व सदस्य सचिव म्हणून कार्य पाहतील. ही समिती वसतिगृहाची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीच्या उपाययोजना सुचवणार असून, सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधून सविस्तर अहवाल शासनास सादर करणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थिनींसाठी सुरक्षित, सुसज्ज व सुविधा युक्त निवास व्यवस्था निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.