
चिपळूण : महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार शेखर निकम यांनी कोकणातील विविध विकासकामांसाठी ठोस मागण्या मांडल्या. गृह विभाग, जलसंपदा, पर्यटन व पर्यावरण या विभागांवर बोलताना त्यांनी जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना वाचा फोडली.
सावर्डे पोलीस स्टेशनसाठी अद्यावत इमारत, चिपळूणसाठी पुररोधक प्रकल्प मंजुरी, आणि वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आमदार निकम यांनी केली.
तसेच, वाशिष्ठी नदीच्या ब्ल्यू लाईन व रेड लाईनचे पुनःसर्वेक्षण करणे आणि पुरस्थितीचा धोका कमी करण्यासाठी शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारावा, असे त्यांनी सुचवले.
जलसंपदा विभागाला उद्देशून बोलताना, आमदार शेखर निकम यांनी तेलेवाडी आणि उमरे धरणाच्या त्वरित दुरुस्तीची गरज व्यक्त केली. नागरिकांना नियमित पाणीपुरवठा व्हावा यासाठी हे धरणे लवकरात लवकर कार्यान्वित करावे, अशी त्यांनी आग्रही मागणी केली.
गडगडी लघु प्रकल्पांतर्गत बंदिस्त पाईपलाइनसाठी धोरण आखावे आणि त्याद्वारे पाण्याचा अपव्यय टाळून शेतीला फायदा होईल, असा मुद्दा त्यांनी मांडला.
पर्यटनाच्या संदर्भात, कोकणातील समृद्ध सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी नमन, खेळे, जाखडी, बाल्या नृत्य, दशावतार, शंकासूर यांसारख्या लोककलांना शासकीय सन्मान मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.
कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी कोकण पर्यटन महामंडळ स्थापन करावे आणि ग्रामीण तसेच कृषी पर्यटनास प्रोत्साहन द्यावे, असा ठाम आग्रह त्यांनी धरला.
तसेच, फॅक्टरींच्या दूषित पाण्यामुळे नद्यांचे प्रदूषण वाढत असल्याकडे लक्ष वेधून, कडक शासकीय धोरण निश्चित करावे व पर्यावरण संरक्षणासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
आमदार शेखर निकम यांच्या या मुद्द्यांना सभागृहात सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, शासन यावर तातडीने कार्यवाही करेल अशी अपेक्षा आहे.