
सावर्डे : उदे ग अंबे उदे आई जगदंबे हा स्वर नवरात्री मध्ये कानावर पडतो आणि मनात नवचैतन्य निर्माण होते. नवरात्रोत्सव म्हणजे आदिमायेचा जागर तिच्या अनेक रुपातील व शक्तीपीठा तील मायेचा उत्सव, भक्तांच्या रक्षणार्थ सदैव पाठीशी असणारी आदिमायेची अनेक रुपे कोकणात पाहावयास मिळतात. नवरात्रीमध्ये अशा मंदिरात देवीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होते. अशीच चिपळूण तालुक्यातील तूरंबव येथील नवसाला पावणारी श्री शारदा देवी प्रसिध्द असून नवरात्रोत्सवात या ठिकाणी भाविक आवर्जून भेट देऊन देवीला साकडे घालतात. नवसाला पावणारी आदिमाया अशी तिची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली आहे.निळ्या आभाळाच्या छायेत आणि निसर्गरम्य डोंगराच्या पायथ्याशी, सावर्डेपासून अकरा किलोमीटरच्या अंतरावर तुरंबव या गावाला अलौकिक निसर्गाची दैवी देणगीच जणू लाभली आहे.गावात गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेले श्री शारदा देवीचे डौलदार मंदिर इतिहासाची साक्ष देत उभे आहे. भक्तांच्या हाकेला पावणारी, माहेरवाशिणी व सासरवाशिणी यांची पाठराखण करणारी दुर्गामाता अशी ग्रामदेवतेची ओळख आहे.
शारदा देवीचे मंदिर म्हणजे दक्षिणात्य स्थापत्य कलेचा एक उत्तम नमुना आहे या मंदिरात श्री शारदा देवी बरोबरच श्री वरदान देवी, श्री मानाई देवी,आणि श्री चंडिका देवी यांच्या मूर्तींची ही प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. नवरात्र काळात या देवीच्या रुप्याच्या मूर्ती बरोबरच गौराई देवीच्या मूर्तीची ही स्थापना करण्यात येते.विजयादशमी पर्यंत नऊ दिवस हा साज भाविकांच्या मनाला एक वेगळाच आनंद देतो.. प्रेक्षणीय विद्युत रोषणाई, विलोभनीय निसर्ग सौंदर्य, फुलांची आरास यामुळे हे मंदिर भाविकांच्या मनाला भुरळ घालते.परंपरागत वेशभूषेत सादर केलेले हे जाखडी नृत्य म्हणजे लोककलेचा एक वेगळाच अविष्कार असतो. हे सर्व पाहण्यासाठी भाविकांची नऊ दिवस गर्दी उसळते. रात्री साडे अकरानंतर संतती विषयक नवस करणे व ते फेडणे याची मंदिरात रीघ लागलेली असते.श्री शारदा देवीचे महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर आहे. आजच्या आधुनिक युगात तरुण पिढीला दांडिया, गरबा अशा नाचांची आवड असताना देखील या उत्सवात गेली शतकापासून सुरू असलेले पारंपारिक जाखडी नृत्य हे भाविकांचे एक मोठेच आकर्षण असते. भारतीय संस्कृतीची परंपरा जपण्याचे अत्यंत उत्तम काम या न्यासाच्या माध्यमातून केले जात आहे. या कालावधीत भेट देणाऱ्या सर्व भक्तांचे अतिशय उत्तम सोय या ठिकाणी केली जाते सर्व सोयी नियुक्त असलेले हे ठिकाण सर्वांच्या मनाला आनंद देऊन जाते. हा उत्सव 12 ऑक्टोबर 2024 रात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहणार असून भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे शारदा देवी न्यासाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. नवरात्र उत्सव कालावधीत श्री शारदा देवीच्या दर्शनासाठी उसळलेली अलोट गर्दी