
सावंतवाडी : खारेपाटणच्या शारदीय प्रतिष्ठानचा प्रा.शरद काळे स्मृती पुरस्कार तळेरे,सिंधुदुर्ग येथील सेवाभावी डॉक्टर दाम्पत्य डॉ.मिलिंद कुलकर्णी व डॉ.ऋचा कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा.अनिल सामंत यांच्याहस्ते हा पुरस्कार धारखंड, वाळपई,गोवा येथे देण्यात आला.
यावेळी 'शारदीय प्रतिष्ठान'चे श्रीमती वर्षा काळे, चारुता काळे प्रभुदेसाई, डॉ.अनुजा जोशी,कपिल काळे आदी उपस्थित होते. यावेळी 'सत्यकथा' या दर्जेदार मासिकात लेखन केलेले व कोकणचे ज्येष्ठ कथालेखक आणि खारेपाटण हायस्कूलचे माजी प्राचार्य शरद काळे यांचे शैक्षणिक, साहित्यिक,सामाजिक कार्य उलगडून दाखवणारा
'ही एक प्रेरक सत्यकथा 'हा कार्यक्रम मालवणच्या साहित्यिक वैशाली पंडित यांनी सादर केला. तळेरे येथे गेली ३० वर्षे कोकणातील गोरगरीब लोकांसाठी एक सहृदय 'कोकणचो डॉक्टर' म्हणून सुपरिचित आलेले डॉ.मिलिंद व डॉ.ऋचा कुलकर्णीं यांना यावेळी रोख रु १०,०००, मानपत्र,शाल श्रीफळ,मोरपीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी दोघांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. काळेसरांसारख्या समर्पित भावनेने आपले कार्य करणाऱ्या एका सत्प्रवृत्त शिक्षक व लेखकाच्या नावे मिळणारा हा पुरस्कार आमच्यासाठी प्रेरक आहे. पुढे कार्य करण्यासाठी बळ देणारा आहे असे दोघांनीही आवर्जून सांगितले. यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना 'गोवा मराठी अकादमी'चे अध्यक्ष प्रा.अनिल सामंत यांनी शरद काळे हे तेजाचा प्रेरक वसा घेऊन उत्तम अध्यापन आणि दर्जेदार साहित्यनिर्मिती करणारे लेखक होते. त्यांनी अनेक नवोदितांना लेखन प्रेरणा दिली तसेच आज नवीन शैक्षणिक धोरणात जे अध्ययन अध्यापन अभिप्रेत आहे ते सर्व शैक्षणिक प्रयोग त्यांनी खारेपाटणच्या शाळेत ४० वर्षापूर्वी सुरू केले होते आणि म्हणूनच ते काळाच्या पुढे होते असे सांगितले. असामान्य व्यक्तिमत्व असूनही सामान्य जगणारे व आपल्या अनेक महामानवांनी दिलेल्या जीवनधारणा आयुष्यभर जोपासणारे ते एक असामान्य व्यक्ती होते हे वेगळेपण त्यांनी अधोरेखित केले. वाळपई परिसरातील मान्यवर साहित्यिक,ग्रामस्थ तसेच तळेरे,खारेपाटण येथील काळे कुटुंबीयांचे स्नेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. श्रीमती वर्षा काळे यांनी मनोगत व्यक्त केले. स्व.शरद काळे यांच्या कन्या सौ.चारुता काळे प्रभुदेसाई यांनी सूत्र संचालन आणि केले. डॉ.अनुजा जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.