शरद काळे : कोकणच्या भूमीतील सच्चे लेखक

Edited by:
Published on: May 25, 2024 08:36 AM
views 536  views

1990 चे दशक सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या साहित्यिक चळवळीच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जायला हवे. या दशकात सिंधुदुर्गात अनेक साहित्य चळवळींचा उदय झाला. यातून अनेक साहित्यिकांचा एकमेकांशी स्नेह वाढला. यातीलच एक ठळक नाव म्हणजे कोकणचे कथाकार असा नावलौकिक मिळविलेले खारेपाटण हायस्कूल व ज्यु. काॅलेजचे माजी प्राचार्य शरद विनायक काळे. 'सत्यकथा' मासिकाने मराठीत स्वतंत्र मानदंड निर्माण केला होता. सत्यकथेमध्ये आपलं लेखन प्रसिद्ध व्हावं म्हणून लेखकांची रांग लागलेली असायची. तिथे लेखन प्रसिद्ध होण्याची प्रतिष्ठा अशी होती,की सत्यकथेवर टीका करणाऱ्यांच्या समूहात सहभागी होणारेही सत्यकथेत आपलं लेखन प्रसिद्ध झाल्यावर आनंद व्यक्त करायचे. अशाप्रकारे एका दंतकथा बनून राहिलेल्या 'सत्यकथे'त कथा प्रसिद्ध होण्याचा मान शरद काळे यांना प्राप्त झाला होता; पण दुसऱ्या बाजूला शरद काळे म्हणजे सिंधुदुर्गच्या साहित्य चळवळीचा चालता बोलता मानबिंदू होता, हे आपल्याला निर्विवादपणे मान्य करावं लागतं.

'शरद काळे म्हणजे लिहिते आणि बोलते लेखक' असे वर्णन त्यांचे आपल्याला करावे लागेल. याची कारणे अनेक आहेत;परंतु त्यातलं प्रमुख कारण म्हणजे आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी लेखनातून शब्दांशी नातं प्रामाणिकपणे जपलं.तर दुसऱ्या बाजूला सतत ते साहित्यविषयक संवाद ठेवून राहिले. असं म्हटलं जायचं की, पूर्वी लेखक लिहितो तेच वाचावं.लेखक दुसऱ्याशी नीट बोलेल याची शाश्वती नाही; पण काळे यांच्याबाबतीत उलट होतं. ते लेखक म्हणून लेखनाशी इमान राखत सतत लिहिते राहिलेच; परंतु ते सतत लेखन क्षेत्रातल्या प्रत्येकाशी बोलत राहिले. कधी कधी ते एवढे बोलायचे,की एखाद्या लेखकाचा पूर्ण तपशीलच सांगून जायचे.ते ऐकताना समोरचा आवाक होऊन ऐकत राहायचा. मात्र दुसऱ्या बाजूला ऐकणाऱ्याला ज्या लेखकाविषयी ते बोलायचे त्याचा साहित्याचा लसावि कळायचा.त्यातून ऐकणाऱ्याच्या साहित्यविषयक ज्ञानात भरच पडायची. आता एकमेकांच्या साहित्याच्या द्वेषातून हा स्नेह नाहीसा झाल्यामुळे आणि लिहिणाऱ्यांच मनही कोरडं झाल्यामुळे काळेसरांसारख्या संवेदनशील अंतर्बाह्य सच्च्या लेखकाची आठवण तीव्रतेने येणे अपरिहार्यच!

१९९० च्या प्रारंभिच कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना झाली आणि कोमसापच्या शाखा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सिंधुदुर्गात सुरू झाल्या. या चळवळीच्या माध्यमातून अनेक लोक एकत्र आले. खारेपाटण सारख्या जिल्ह्याच्या एका टोकाला असलेल्या गावात गुरूवर्य शंकरराव पेंढारकरांनंतर प्राचार्य म्हणून तशीच ध्येयनिष्ठ शिक्षणसेवा देणा-या काळेसरांचा साहित्यिक संपर्क यानिमित्ताने होऊ लागला. कणकवलीची कोमसाप शाखा त्यावेळी सर्वात सक्षमपणे कार्यरत होती. याचं कारण काळे यांची कणकवलीतील अभिजात साहित्याची आवड असणारी साहित्य चळवळीशी निष्ठा असणारी मित्रमंडळी. यानिमित्ताने काळेसरांचे कणकवलीत येणे जाणे वाढले आणि मग या शहरात लिहिणाऱ्या किंबहुना सिंधुदुर्गात लिहिणाऱ्या नव्या लेखकांची आणि त्यांची बांधिलकी वाढत गेली. नवीन एखादा लेखक - कवी गुणवत्तेने लिहितो आहे हीच गोष्ट त्यांच्यासाठी मोठी होती. त्यांनी कधीच लेखकाचा जात-धर्म पाहिला नाही. याची आपल्याला अनेक उदाहरणे सांगता येतील; परंतु विद्रोही चळवळीतील एक समर्थक कवी आ.सो शेवरे यांच्याशी त्यांचे असलेले मैत्रीपूर्ण सबंध सर्वश्रुत आहेत. या दोघांच्या साहित्याविषयी गप्पा रंगात आल्या,की ऐकणाऱ्यानेही स्वतःचं भान भरपूर त्या एकत्र राहाव्यात असा अनुभव त्याकाळी आमच्यासारख्या नव्या कवींनी घेतला होता. आबा शेवरेंवर त्यांचा अपूर्व असा जीव होता. शेवरे यांच्या कविता लेखनाचे ते साक्षीदार होते; परंतु प्रसंगी त्यांच्या रोजच्या जगण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी काळे यांची धडपड असायची. तर दुसऱ्या बाजूला सिंधुदुर्गातील आजचा बहुचर्चित कवी सफरअली इसप हा मुलगा काही वेगळेच अनुभव आपल्या कवितेतून मांडतो आहे असं निरीक्षण काळे यांनी सफरच्या कवितेबद्दल 25 वर्षांपूर्वीच नोंदवून ठेवले होते. आणि त्याची प्रचीती सफर यांचा यावर्षी प्रसिद्ध झालेल्या 'अल्लाह ईश्वर' या दर्या प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या काव्यसंग्रहातून येत आहे. यावरून शरद काळे यांना एखाद्याच्या गुणवत्तेची किती सूक्ष्म पारख होती, वाचक व जाणकार म्हणून ते किती द्रष्टे होते हे लक्षात येते.

शरद काळे उत्तम कथा लेखक होते. तसे ते चांगले कवीही होते; परंतु कुठल्याही चांगल्या कवीबद्दल त्यांनी कधीच दुस्वास केला नाही. उलट अधिक जीव लावला. या संदर्भातली एक घटना आवर्जून नोंदवण्यासाखी आहे. मराठीतील प्रसिद्ध कवी डॉ. अनिल धाकू कांबळी हे सुद्धा काही दिवस खारेपाटणला होते. त्यातून काळे यांच्याशी स्नेह त्यांचा वाढत गेला. सावंतवाडीला श्रीराम वाचन मंदिर मध्ये डॉ. कांबळी यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होते. या कार्यक्रमाला खारेपाटण सारख्या दूर भागातून काळे सर आणि त्यांची मित्रमंडळी खास डॉ. कांबळी यांच्या या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनासाठी सावंतवाडीत उपस्थित होती. अन्य एका कार्यक्रमात या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा असल्यामुळे तो लांबला. मात्र डॉ.कांबळी यांच्या प्रेमाखातर त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभासाठीच खास आलेल्या काळे सरांना ही गोष्ट मात्र सहन झाली नाही. त्यांनी तातडीने मंचावर जाऊन आयोजकांना याबद्दल जाब विचारला आणि लगेच डॉ. कांबळींचा काव्यसंग्रह प्रकाशित करून घेतला. सच्चा लेखक कलावंत अशी गोष्ट जाहीरपणे करू शकतो. शरद काळे यांच्यातला आतला सच्चेपणा यावरून लक्षात येतो! सावंतवाडीला 25 वर्षांपूर्वी अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाच्या निमित्ताने शरद काळे त्यांनी 'फुलराणी' नावाचा बाललेखनाचा विशेषांक प्रसिद्ध केला होता. तो एवढा उत्तम होता, की या संमेलनातील सहभागी  इंदिरा संत, शंकर सारडा आणि वसंत सावंत अशा मातब्बर लोकांनी या विशेषांकाचे या संमेलनात जाहीरपणे कौतुक केले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यानंतर आजतागायत बालसाहित्याचा एवढा उत्तम विशेषांक निघालेला नाही. यातून शरद काळे यांच्या संपादनाचे कौशल्य लक्षात येईल!

शरद काळे व पत्नी वर्षा काळे यां दोघांनी मिळून खारेपाटणमधे उभ्या केलेल्या व हजारो विद्यार्थी कुशलपणे घडवणा-या खारेपाटणच्या शिक्षण संस्थेच्या ध्येयनिष्ठ कामालाही आज काळेसरांच्या दुस-या स्मृतिदिनी उजाळा द्यावासा वाटतो. सरांची सर्व मुले ,नातवंडे परिवारही उच्चविद्याविभूषित व कलासक्त आहे. त्यांचे भाऊ श्रीराम काळे कथालेखक आहेत. त्यांची मुलगी डॉ.अनुजा जोशी उत्तम कवयित्री - लेखिका आहेत. मोठी मुलगी चारुता मुख्याध्यापक,गीतकार, बालसाहित्यिक आहे. जावई शरद प्रभुदेसाई प्रसिद्ध चित्रकार आहेत.मुलगा कपिल काळे अभियंता व कलेची,सामाजिक कामाची आवड असणारा आहे. त्यामुळेच आता शरद काळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 'शारदीय प्रतिष्ठान' या संस्थेच्या रुपात काही नवीन सांस्कृतिक काम करण्याचा मनोदय त्यांच्या या परिवाराने व्यक्त करून त्याला निश्चित स्वरूप देण्याचे ठरविले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्राच्या दृष्टीने ही सकारात्मक घटना आहे. या माध्यमातून या काळे परिवाराच्या हातून खूप चांगलं काम घडू दे याच माझ्या शुभेच्छा!

अजय कांडर