
गुहागर : येथील प्रसिद्ध खातू मसालेचे उत्पादक, मालक, संचालक श्री. शाळीग्राम खातू यांना अमेरिकेतील जागतिक मानवी हक्क आयोगाच्या विद्यापीठाने महत्त्वाची मानली जाणारी डॉक्टरेट ही पदवी देऊन सन्मानित केले आहे. याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. गुहागर तालुक्यातील शाळीग्राम खातू यांनी सन १९७८मध्ये खातू मसाले हा ब्रँड बाजारात आणला. अतिशय मेहनत घेऊन त्यांनी आपला मसाला उद्योग भरभराटीस नेला आहे. आज पाटपन्हाळे येथे खातू मसाले उद्योग समूहाच विस्तार केला आहे. संपूर्ण कोकणात चार हजारपेक्षा जास्त विक्रेते, आहेत. इतकेच नाही, तर मुंबईसारख्या शहरात आणि परदेशात देखिल खातू मसाले प्रसिद्ध झाले आहेत. शिवाय कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा व इतर जिल्ह्यात खातू यांच्या मसाल्यांना मोठी मागणी असते. मुंबईत मॉल, डी मार्टमध्ये मसाले उपलब्ध केले आहेत. तसेच ऑनलाईन पद्धतीने मसाल्याची मागणी करण्याची सुविधा निर्माण केली आहे.
या मसाल्याच्या एकूण सतरा व्हरायटी आहेत. त्याचबरोबर खाद्यपदार्थात उपयोगी येणारी विविध कडधान्य यांची विकसित केलेली वेगवेगळ्या चवीनुसार पिठे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. शाळीग्राम खातू यांनी मसाला उद्योगात केलेली ही प्रगती आणि संशोधन विचारात घेऊन जागतिक मानव हक्क आयोगाच्या विद्यापिठाने त्यांना उद्योग व्यवसायातील डॉक्टरेट ही पदवी दिली आहे. दिल्ली येथे या विद्यापिठामार्फत प्रमुख अतिथींच्या आणि मानवी हक्क आयोगाच्या अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शाळीग्राम खातू यांना डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले.










