
सावंतवाडी : शक्तीपीठ महामार्गाला विरोध करून सिंधुदुर्गचा विकास थांबवून ठेवा असं माझं स्पष्ट मत आहे. जैवविविधतेच काय नुकसान होतंय यासाठी माझ्यासोबत चर्चेला बसा. हा रोड गेल्यामुळे समृद्धी येणार आहे. अन्यथा आमच्या लोकांनी भुकेन मरायच का ? इथे उद्योग, विकास व्हायला नको का ? असा सवाल माजी मंत्री आ. दीपक केसरकर यांनी केला. ग्रीन कव्हर आमच्या लोकांनी राखलं आहे. आता बोलणारे कोणी तेव्हा आले नाहीत. आमच्या लोकांनी जंगल राखलीत. त्यावर अधिकारही त्यांचाच आहे. महामार्ग माझ्या मतदारसंघातून जातोय. माझा ठाम पाठिंबा त्याला आहे असही ते म्हणाले.
केसरकर पुढे म्हणाले, आमचा विकास थांबवण ही कोणती निती आहे ? आमची लोक एक झाड तोडले तर चार झाड लावतात. आमचा विकास थांबवून फक्त श्रेय न घेता ग्रीन कव्हर नाही तिथे झाड लावा. नागपूरचा टायगर बघितल्यावर इथला ब्लॅक पँथर बघायला पर्यटक आले पाहिजे. इथला समुद्र बघायला लोक आले पाहिजे. शक्तीपीठ महामार्ग माझ्या मतदारसंघातून जातोय. माझा ठाम पाठिंबा त्याला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा मार्ग समृद्धी महामार्ग वाढवणं बंदराला जोडला तसाच हा शक्तीपीठ महामार्ग रेडी बंदराला जोडावा ही माझी मागणी आहे. येथून नागपूरची संत्री, आमचा माल परदेशात जाऊ शकतो असं मत व्यक्त केले. तसेच आमच्या लोकांनी ही झाडं लावलेली आहेत. त्यामुळे ती झाडं आमच्या लोकांची आहेत. आमच्या लोकांचं भल करुन निसर्ग पर्यटनाच रक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे. आम्ही ती पूर्ण करू, आजपर्यंत आम्ही ते केलं आहे असं विधान श्री. केसरकर यांनी केलं.