
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हयातील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यात यावेत या साठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग सिंधुदुर्ग यांच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रवेश द्वारावर सोमवारी लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.
आपल्या लाक्षणिक आंदोलनानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रखडलेली विज्ञान विषय शिक्षक पदोन्नती प्रक्रिया राबविणे. सिंजिप/शिक्षण/प्राथ/आस्था-२/५१६४ या शिक्षण विभाग (प्राथमिक) च्या १३/०२/२०२४ पत्रानुसार गणित व विज्ञान पदवीप्राप्त उपशिक्षकांना पदवीधर शिक्षक पदी पदोन्नती देण्यासाठी अंतिम सेवाजेष्टता यादीतील उपशिक्षकांचे प्रस्ताव सादर करण्यात आलेले असून अद्याप त्यांना पदस्थापना देण्यात आलेली नाही. ही रखडलेली प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्यात यावी, विस्तार अधिकारी पदोन्नती प्रक्रिया रखडलेली आहे तीही राबविण्यात यावी, इतर जिल्ह्यातील आंतरजिल्हा बदलीस पात्र उमेदवारांना त्या त्या जिल्हा परिषदेने कार्यमुक्त करण्यात आलेले आहे. तरी आपल्या जिल्हा परिषदेनेही पात्र शिक्षकांना कार्यमुक्त करावे,आंतरजिल्हा बदलीने स्व जिल्ह्यात गेलेल्या शिक्षकांची PF रक्कम अद्याप त्यांच्या खाती वर्ग करण्यात आलेली नाही ती लवकरात लवकर करण्यात यावी, वरिष्ठ वेतनश्रेणी रक्कम शिक्षकांच्या खाती वर्ग करणे. आदी मागण्या नमूद केल्या आहेत. या वेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिशद प्राथ विभाग शाखा सिंधुदुर्ग चे जिल्हाध्यक्ष गणेश नाईक,सुनील कारांडे,आनंद तांबे,रुपेश परब,निंगोजी कोकितकर,रुपेशकुमार गुंजाळ, वल्लभांनद प्रभू,प्रणिता भोयर,सरिता परब आदींसह शिक्षक उपस्थित होते.