शिक्षक भारतीच्या शिलेदारांनी दोडामार्गात करून दाखवले

तिरंगी लढतीत दयानंद नाईक यांचा खेचून आणला विजय
Edited by: संदीप देसाई
Published on: May 17, 2023 19:14 PM
views 75  views

दोडामार्ग : जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या शिक्षक पतपेढीच्या निवडणुकीत  दोडामार्ग तालुका संचालक पदाच्या निवडणुकीत शिक्षक भारतीचे राज्य उपाध्यक्ष दयानंद नाईक हे विजयी झाले आणि कै. सखाराम झोरेंची स्वप्नपूर्ती झाली अशी प्रतिक्रिया दोडामार्ग शिक्षक भारतीने दिली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत प्रचंड मेहनत घेत शिक्षक भारतीच्या शिलेदारांनी शिक्षक भारतीचा संचालक शिक्षक पतपढीवर निवडून आणला.

तळागाळात संघटना पोहोचविण्याचे कार्य करणारे शिक्षक प्रिय व्यक्तिमत्व दयानंद नाईक ३० वर्षे संचालक पदाच्या प्रतिक्षेत होते, पण या निवडणुकीची शिस्तबद्ध तयारी व शिलेदारांनी घेतलेली मेहनत अखेर यशस्वी ठरली नव्हे तर शिक्षक भारतीने तालुक्यात पहिल्या क्रमांकाची पसंदी शिक्षकांतून मिळविल्याने जिल्ह्यात सुद्धा दोडामार्ग शिक्षक भारतीचा ताकद अधोरेखित झाली आहे. शिक्षक भारतीने हा विजय शिक्षक भारतीचे दिवंगत शिलेदार कै. सखाराम झोरे यांना समर्पित केला आहे. 


आमदार कपिल पाटील यांच्या माध्यमातून राज्य स्तरावर शिक्षकांचे प्रश्न सोडविणे व तालुकास्तर कै. सखाराम झोरे यांच्या माध्यमातून शिक्षकांच्या समस्या सोडविणे हे दोन मुद्ये त्यांच्या विजयाच्या केंद्रस्थानी होते. शिलेदारांच्या प्रचंड आत्मविश्वासावर जिल्हयात परिवर्तन पॅनेल युती करण्यासाठी परवानगी देऊन कोणत्याही प्रकारची बंडखोरी न करता सन्मानपूर्वक त्यांनी ही लढाई स्विकारली. त्यावेळी युती तुटते म्हणून आपल्या सीटचा धोका पत्करून निवडणूक लढणाच्या व विजयश्री खेचून आणणाऱ्या शिक्षक भारतीच्या शिलेदारांचे आता या यशानंतर जिल्हाभरात कौतुक होत आहे.

स्वार्थापेक्षा संघटना मोठी हे शिक्षक भारती दोडामार्गने दाखवून दिले. दोडामार्ग शिक्षक भारतीचे कार्य येणाऱ्या काळात संपूर्ण जिल्हाभर संघटना उभारणी साठी आदर्शवत ठरेल. नेता कसा असावा, कार्यकर्ते कसे असावे, संघटन कसे असावे हे घडे शिक्षक भारतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याला या निवडणुकीच्या माध्यमातून दिले आहेत. आपले एकही मत इकडे तिकडे न होऊ देता अन्य शिक्षकांची मते मिळविण्यासाठी कार्याच्या माध्यमातून यशस्वी होता येते हे शिक्षक भारती दोडामार्गने सर्वांना दाखवून दिले असेच म्हणावे लागेल. दोडामार्ग शिक्षक भारतीची स्थापना ५ वर्षापूर्वी झालेली असताना ३० वर्षाच्या पतपेढीतील सत्ता मोडीत काढणे व पतपेढीमध्ये स्वतःचा संचालक बसविणे हे खूप मोठं यश अल्पावधीत शिक्षक भारतीने साध्य केलं, असे जिल्ह्यातील इतर संघटना नेत्यांनी सुध्दा बोलून दाखविले आहे. भाग्यलक्ष्मी पॅनलची जिल्हयात हवा असताना दोडामार्ग तालुक्यातील लढतीमध्ये प्रवाहाच्या विरोधात जाऊन शिक्षक भारतीने आपला झेंडा रोवत खऱ्या अर्थाने इतिहास घडविला. प्रेमाने, आपुलकीने, आदराने, आणि विश्वासाने कार्य करत संघटना वाढते. हे या निवडणुकीतून अधोरेखित झाले असून दोडामार्ग तालुक्यांतील शिक्षक भारतीच्या शिलेदारांत नवचैतन्य निर्माण झालं आहे.

   शिक्षक भारतीचे तालुका सचिव कै. सखाराम झोरे यांनी ५ वर्षांत राज्य, जिल्हा, तालुकास्तरावर शिक्षकांची व इतरांचीही न होणारी कामे केली. ही कामे करताना त्यांनी संघटना पाहिली नाही. शिक्षक पाहिला. शिक्षकांच्या प्रश्नासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली. त्यामुळे हा विजय प्राप्त झाला. ते आज असते तर मात्र विजयाची आघाडी मात्र दुप्पट झाली असती, एवढे कार्य त्यांनी करून ठेवले होते.

हा विजय आम्ही कै. सखाराम झोरे यांना तसेच शिक्षक संघटना स्थापन करणाऱ्या कै. भैरू वरक तसेच हया संघटनेची वाटचाल कशी असावी याविषयी सदैव मार्गदर्शन करणारे कै. वसंत नारायण दळवी गुरुजी यांना आम्ही समर्पित करत असल्याचे सांगत आता पुन्हा एकदा शुन्यातून सुरुवात करू व शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सदैव प्रयत्नशिल राहू अशी ग्वाही संघटनेचे जिल्हा सचिव अरुण पवार व कोषाध्यक्ष रविंद्र देसाई यांनी दिली आहे. 

   हा विजय केवळ संघटनेच्या कुशल टिम वर्कमुळे मिळाला. प्रत्येक शिलेदाराने कै. सखाराम झोरेचे स्वप्न उराशी बाळगून काम केले, त्यामुळे आमचा विजय सत्यात उतरल्याचे अरुण पवार, रवि देसाई, मणिपाल राऊळ, राकेश कर्पे, गोपाल पाटील, निलेश सावंत, रामचंद्र घाडी, दत्तप्रसाद देसाई, आनंद, नाईक, मनोज गावडे, यशवंत गवस, रामा गवस प्रमोद कुडास्कर, संदेश नाईक जयेंद्र बिर्जे, शैलेश नाईक, जना पाटील, प्राची गवस, पोपट कोळी अनिल आडे यांनी म्हटले आहे.


त्रिमूर्ती ठरली विजयाची शिल्पकार


सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षकांचे आक्रमक नेतृत्व, शिक्षक पतपेढीचे माजी संचालक महेश नाईक, सातत्याने शिक्षकांच्या हक्कासाठी लढणारे नेतृत्व रवींद्र देसाई तसेच अभ्यासू व्यक्तिमत्व अरुण पवार या त्रिमूर्तीन शिक्षक भारतीच्या माध्यमातून आता दोडामार्ग तालुक्यावरच नव्हे तर सबंध जिल्ह्यात आपली पकड मजबूत केली आहे. आणि एकमेव दोडामार्ग तालुक्यात स्वतंत्र लढून आपला हक्काचा संचालक शिक्षक बँकेवर निवडून आणत आपणच किंगमेकर असल्याचे सिद्ध केलं आहे.