
मंडणगड : तालुक्यातील तुळशी गावचे शाहीर मोहन अर्जुन पाडावे यांना ए.डी. फाउंडेशन, सांगली महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त साहित्यरत्न जीवन गौरव पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला आहे. शाहीर पाडावे हे सन १९९७ पासून लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य करीत आहेत. तब्बल २८ वर्षांच्या या कार्यकाळात त्यांनी रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील असंख्य व्यासपीठांवरून प्रभावी लोककला सादर केली.
सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक विषयांवर त्यांनी लोकगीत, भारूड, कथा व कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकजागृती घडवली आहे. त्यांच्या गीतांमधून स्त्रीभ्रूणहत्या निर्मूलन, पौराणिक कथा, थोर महापुरुषांचे जीवनकार्य तसेच समाजहिताचे अनेक मुद्दे केंद्रस्थानी राहिले. लोककलेच्या जतन–संवर्धनासाठी त्यांनी केलेला प्रामाणिक आणि अखंड प्रयत्न आजही सुरू आहे.
याआधी “कलगीतुरा तुरा कला मंडळ (रजि.) रायगड-रत्नागिरी” तसेच “संभूराजु तुरेवाले सांस्कृतिक कला मंडळ (रजि.) रायगड-रत्नागिरी” या मान्यवर संस्थांकडून त्यांना पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.
शाहीर मोहन पाडावे यांचा हा पुरस्कार त्यांचे योगदान अधोरेखित करणारा ठरला असून, ग्रामीण भागातील कला-संस्कृती जपणारा त्यांचा मार्ग नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.