वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश ; पोलिसांची धडक कारवाई

Edited by: दिपेश परब
Published on: July 07, 2023 23:21 PM
views 391  views

वेंगुर्ले:  तालुक्यातील आजगाव येथे चालणाऱ्या अवैध वेश्या व्यवसायावर वेंगुर्ले पोलिसांनी धडक कारवाई करत या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. येथील माळयारवाडी येथे राहत्या घरात संतोष मधुकर लुडबे (५२) हा व्यक्ती बऱ्याच दिवसापासून वेश्या व्यवसाय चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच आज (७ जुलै) पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. यात आरोपी संतोष लुडबे सहित परराज्यातील ३ महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान या कारवाई नंतर जिल्ह्यात असे वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे अधोरेखित झाले असून यावर पोलीस अधीक्षक काय ऍक्शन घेतात याकडेही जिल्हा वासीयांचे लक्ष लागले आहे. 

     सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दारू मटका जुगार यासारख्या अनैतिक धंद्यांबरोबरच वेश्याव्यवसाय ही चालू आहे हे आजच्या आजगाव येथील कारवाईमुळे समोर आले आहे. काही दिवसापासून आजगाव‌ येथे चालू असलेल्या वैश्या व्यवसायासंबंधी कारवाई व्हावी यासाठी स्थानिक आजगाव, नाणोस, भोमवाडी, तिरोडा येथील जागृक महिला, ग्रामस्थ यांनी ग्रामपंचायत मध्ये निवेदन देऊन आवाज उठवलेला होता। त्यामुळे स्थानिक सरपंच यांनी‌ जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, पोलीस अधिक्षक सिंधुदुर्ग यांच्याशी कारवाई करण्यासाठी ठोस पावले उचलावीत यासाठी निवेदन दिले होते. या अनुशंगाने आज आदरणीय पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या नियंत्रणाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले व टीम तसेच वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव आणि त्यांची टीम यांनी अथक परिश्रम करून बेकायदेशीर कुंटणखाना चालवून महिलांना वेश्या गमनासाठी प्रवृत्त करणाऱ्या आरोपीवर ही कारवाई करण्यात आली.

    संतोष मधुकर लुडबे  हा अन्नपुर्णा सेक्स वर्कर वेल्फेअर फौंडेशन या संस्थेच्या नावाखाली महिला व मुली यांना आणून वेश्याव्यवसाय करीत असल्याबाबत माहिती मिळाल्याने या ठिकाणी ठिकाणी छापा टाकून आरोपी सहित ३ पीडित महिलामिळून आल्याने त्यांना सुरक्षिततेसाठी महिला अंकुर केंद्र सावंतवाडी येथे पाठवण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिली आहे. 

अन्नपुर्णा सेक्स वर्कर वेल्फेअर फौंडेशन या संस्थेच्या नावाने संतोष लुडबे यांनी संस्था निबंधक सिंधुदुर्ग  यांचा परवाना असल्याबाबत पत्र पोलिसांना दाखवले होते. आणि या पत्राच्या आधारे संतोष लुबडे हा वेश्या व्यवसाय करत असल्याचे समोर आले आहे.