वैभववाडीत गटार गेले चोरीला, नगरसेवक आक्रमक

सत्ताधारी व विरोधक यांच्यातील संघर्ष पुन्हा पेटणार
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 19, 2023 09:03 AM
views 295  views

वैभववाडी : वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक सातमध्ये बांधण्यात आलेले गटार विकासकाने बुजविले आहे. यावरून विरोधी पक्षाचे नगरसेवक आज आक्रमक होत त्याठिकाणची पाहणी केली. या गटारावर सुमारे १७ लाख रूपये खर्च झाले आहेत. या प्रकरणी गटार बुजविणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी नगरपंचायतीच्या काही नगरसेवकांनी केली आहे. या विषयावरून सत्ताधारी व विरोधक यांच्यातील संघर्ष पुन्हा पेटणार आहे.

   वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या प्रभाग सातमध्ये १७ लाख रूपये खर्चुन गेल्या वर्षी गटारांचे बांधकाम करण्यात आले आहे.याच ठिकाणी जमीनमालकांकडुन सध्या प्लॉटिंगचे काम सुरू असुन हे काम करीत असताना बांधण्यात आलेले गटार पुर्णतः बुजविले आहे.या प्रकरणी सर्वसाधारण सभेत चर्चा झाल्यानंतर आज ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक रणजित तावडे आणि अपक्ष नगरसेवक अक्षता जैतापकर, नगरसेवक मनोज सावंत यांनी गटारांची पाहणी केली. पाहणीदरम्यान गटार पुर्णत बुजविल्याचे त्यांच्या निर्दशनास आले. लाखो रूपये खर्चुन करून बांधण्यात आलेले गटार बुजविणाऱ्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी तीनही नगरसेवकांनी केली आहे.


प्रत्यक्ष घटनास्थळी आज तिनही नगरसेवक गेले होते.११ एप्रिलला याप्रसंगी नगरसेविका अक्षता जैतापकर यांनी असे सांगितले की, नगरपंचायतीची सर्वसाधारण  सभा ११ एप्रिलला होती. त्या सभेला जाण्यापुर्वी नागरिकांकडुन प्रभाग सातमधील गटाराविषयी माहीती देण्यात आली. त्याच दिवशीच्या सभेत गटारासंबधी विषय मांडला होता. मात्र त्यासंदर्भात अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. आज प्रत्यक्षात पाहीले असता गटारच अस्तित्वात नाही. प्रशासन व सत्ताधारी यांनी यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यांच्यासोबत असलेल्या श्री तावडे यांनी या सर्व प्रकाराला प्रशासन व सत्ताधारी यांना जबाबदार ठरवले. नगरपंचायतीने १७ ते १८ लाख रूपये खर्चुन गटार बांधकाम केले होते. परंतु सद्यस्थितीत तेथे गटार दिसुनच येत नाही.त्यामुळे ज्या कुणी हे गटार बुजविले आहे त्यांच्यावर नगरपंचायतीने गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. या संपूर्ण प्रकाराबाबत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरज कांबळे यांच्याशी  संपर्क साधला असता त्यांनी या प्रकाराला दुजोरा दिला आहे. सदर ठिकाणच्या वस्तुस्थितीची पाहणी नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी केलेली आहे. विकासकाकडून प्लॉटींग करीत असताना गटाराच्या काही भागात माती पडली आहे. ती माती संबधित विकासकाकडुन काढुन घेण्यात येणार आहे.ते गटार पुन्हा सुस्थितीत आणले जाईल.अशी संबंधित विकासकाला नोटीस दिली जाईल. त्याने तसे न केल्यास त्यांच्यावर रितसर कारवाई केली जाईल, असं श्री. कांबळे यांनी सांगीतले. याबाबात त्या जागेचे विकासक भालचंद्र रावराणे यांची भूमिका जाणून घेतली असता ते असे म्हणाले, बाजारपेठेतील येणाऱ्या पाण्याचा योग्य पध्दतीने निचरा व्हावा याकरीता मी माझ्या जमीनीतुन जागा देत असुन गटारातील पाणी नदीत थेट जाऊ नये म्हणुन नदीलगत माझीच जमीन मी विनामुल्य नगरपंचायतीला देत आहे. नगरपंचायतीच्या सुचनेप्रमाणे काम करण्यात येईल असे रावराणे यांनी सांगितले.

    नगरपंचायतीच्या प्रभाग सात मधील या प्रकारावरून सत्ताधारी व विरोधक पुन्हा एकमेकांच्या समोर ठाकले आहेत.येणा-या सर्वसाधारण सभेत हा विषय गाजण्याची शक्यता अधिक आहे.