
दोडामार्ग : संततधार सुरु असलेल्या पावसामुळे दोडामार्ग - बांदा मार्गावरून ठिकठिकाणी गटार नसल्यामुळे पावसाचे सर्व पाणी रस्त्यावरून वाहत असून रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील रस्त्याच्या दोन्ही बाजूचे गटार खुले करावे जेणेकरून पावसात याचा त्रास वाहन चालकांना होणार नाही. अशी मागणी वाहन चालकातून होत आहे.
मान्सून पूर्व सुरु झालेल्या अवकाळी पावसाने दोडामार्ग तालुक्याला चांगलेच झोडपून काढले. प्रत्येक गावागावा रस्त्यावरून पाणी वाहत आहे. दोडामार्ग बांदा मार्गावर रस्त्याच्या बाजूला काही ठिकाणी गटारच नाही. तर काही ठिकाणी असलेले गटार माती दगड जाऊन गच्च भरलेले आहेत. त्यामुळे पावसाचे सर्व पाणी नदीच्या स्वरूपात रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे प्रत्येक वाहन चालकांना तारेवरची कसरत करून वाहने चालवावी लागत आहे.
दोडामार्ग बांदा मार्गावर बांदा पानवळ येथे तर चिखल पाणी दगड एकत्र साचल्यामुळे काल रात्री एका दुचाकीस्वाराचा अपघातही झाला. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ गटार मारून व बंद झालेली गटारे खुली करून वाहनचालकांना होणारा त्रास दुरु करावा.