फोंडाघाट बाजारपेठेतील गटार कॉंक्रिटीकरण काम निकृष्ट दर्जाचे

रुंदीकरण होऊनही वाहतूक समस्या होतेय निर्माण
Edited by:
Published on: May 04, 2023 16:55 PM
views 109  views

कणकवली : फोंडाघाट बाजारपेठेतील रस्ता पाच मीटर ऐवजी पाच- सहा-सात मीटरने रस्ता रुंदीकरणाचे काम गेले दोन महिने कुर्मगतीने चालू आहे.स्थानिक ठेकेदाराला सहकार्य करा,असे आमदार नितेश राणे यांनी आवाहन केल्याप्रमाणे बहुतांश व्यापाऱ्यांनी आपले अतिक्रमण हटवताना चिरेबंदी- मातीच्या भिंती पाडून सहकार्य केले. मात्र ठेकेदारांनी मापे घेताना काही ठिकाणी मध्यापासून चार मीटर, पाच मीटर, सात मीटर गटारे खोदून इमारतींना धोका पोहोचवला आहे. यावेळी गेले दोन महिने कामावर कामगार, व्यतिरिक्त बांधकाम विभागाचे अधिकारी अथवा विभागीय अभियंता कधीही दिसत नव्हते. रात्री उशिरापर्यंत कामे सुरू असल्याने पेठेतील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. सक्षम अधिकारी नसल्याने कॉंक्रिटीकरण सुद्धा निकृष्ट दर्जाचे होत आहे. याची पडताळणी ग्रामस्थांना बरोबर घेऊन केल्यास नक्कीच स्पष्ट होऊ शकते. 


तारीख दोन मे पूर्वी आपले अतिक्रमणे हटवा, असे पत्र बांधकाम विभागाकडून जाहीर केल्यानंतर,रातोरात एसटी स्टँड समोरील खोके धारकांनी आपले खोके इतरत्र हलवून रस्ता मोकळा करून दिला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी अतिक्रम विरोधी मोहीम राबविण्यात आली नाही. मात्र बाजारपेठेतील विरोध असणारे नागरिक आणि व्यावसायिक आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. त्यामुळे येथील स्थानिक नेते संदेश पटेल यांना कार्यकारी अभियंता यांनी फोन करून विरोध असलेल्यांशी बोलू.त्यातून मार्ग काढूया असे कळविल्यावर समाधानाचे वातावरण आहे.

मात्र या निमित्ताने रस्ता रुंदीकरणाचे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून, त्यावर कार्यकारी अभियंता कसा मार्ग काढतात ? याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.....

बांधकाम विभागाच्या या पत्रात व्यापारी-घरमालक यांना पथकिनाऱ्याचे उल्लंघन केल्याने, व अतिक्रमण झाल्याने ते तारीख २-०५-२३ पूर्वी, स्वखर्चाने काढून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या नंतर त्यानी स्वतःहून आपले स्टोल बाजूला घेतले तर उपलब्ध रस्त्याचा लँडप्लॅन जो भूमी अभिलेख कडून प्रमाणीत करून घेण्यात आल्याने, त्याची हद्द १४ मीटर दर्शवण्यात आली आहे. त्यामुळे हे बांधकाम अतिक्रमण ठरवून ते काढण्याचे कळविण्यात आले आहे. मात्र ही वस्तुस्थिती खोटी असून दोन वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत हा रस्ता भूमी अभिलेख कडे वर्ग अथवा नोंद नसल्याचे दस्तूर खुद्द अधिकाऱ्यांनी आमदारांचे समक्ष सांगितले होते. त्यावेळी ५ मीटर प्रमाणे रस्ता रुंदीकरणाला सर्वांनी सहमती दर्शवली होती. बाजारपेठेमध्ये बहुसंख्य घरे सुमारे १०५ वर्षांपूर्वीची एनए असून त्यामध्ये जर अतिक्रमण केले असेल तर ते काढून देण्यास सर्व ग्रामस्थ तयार होते.


 रुंदीकरणाबाबत आजवर सक्षम अधिकाऱ्यांनी ग्रामस्थ- व्यापाऱ्यांशी साधक बाधक चर्चा केलेली नाही किंवा चर्चेच्या फेऱ्याही झाल्या नाहीत. सहविचार सभा सात मिनिटात आवरताना कोणाचेही बोलणे ही ऐकून घेतले गेले नाही. कार्यकारी अभियंता सार्वगौड साहेबांनी आचार्य विनोबांच्या भूदान चे उदाहरण देऊन सगळ्यांना मंत्रमुग्ध केले. आणि रस्ता रा.म. १७८ हा पारंपारिक रस्ता असल्याची असल्याचे सांगत रुंदीकरणाला सहकार्य करण्याचे  आवाहन केले. त्यामुळे जीर्ण झालेली किंवा नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत असलेली घरे-इमारती, पेठेतील घरमालकांनी पाडून रुंदीकरणाच्या गटाराला जमिनी मोकळ्या करून दिल्या. याचाच फायदा ठेकेदारांनी घेतला.आणि आपल्या माणसांशी तडजोड करून सहा मीटर ऐवजी काही ठिकाणी चार मीटर वर तर काही ठिकाणी सात मीटरवर गटारे खोदली आहेत.बांधलेल्या गटारावर अनधिकृत बांधकाम, व्यावसायिक, भाजी- मासे विक्रेते, होकर्स यांचे अतिक्रमण ही झाले आहे. याकडे ना सक्षम अधिकाऱ्याचे लक्ष, ना ग्रामपंचायतीचे ! मग ज्यासाठी हा खेळ मांडला,तो वाहतूक खोळंबा टाळणार कसा ? असा प्रश्न सर्वसामान्यातून विचारला जात आहे.


ज्या विकास कामासाठी संपूर्ण पेठेतील ग्रामस्थ व्यावसायिकांनी सहमती दर्शवली त्या फोंडाघाटच्या ड्रीम प्रोजेक्ट ला सार्वजनिक बांधकाम खाते, ठेकेदार, ग्रामपंचायत यांच्या नियोजनशून्य-उद्धट आणि हम करे सोssss कामकाजा मुळे, आता बाजारपेठेतील ग्रामस्थ- व्यापारी, झक मारून सहमती दिली असा संताप व्यक्त करीत आहेत.