वेंगुर्ले शहरात उपठेकेदारांमुळे निकृष्ट विकासकामे !

Edited by: दिपेश परब
Published on: May 09, 2024 13:48 PM
views 113  views

वेंगुर्ले : वेंगुर्ले शहरात सुरू असलेली नगरपालिकेची ९० टक्के कामे हि उपठेकेदारांमार्फत होत असून निकृष्ट दर्जाची होत आहेत. या निकृष्ट प्रतिच्या कामाचे उदाहरण नवीन म्हाडा काँलनी ते आनंदवाडीपर्यंतच्या बंदिस्त गटाराचे काम होय. याच भागातील बंदिस्त गटावर डंपर अपघात घडला. त्यामुळे वाहनधारक, पादचारी, व प्रवाशांना नाहक 3 तास त्रास सहन करावा लागला. सदर भागाचे तात्काळ मजबुत बांधकाम करण्यात यावे. अशी मागणी त्या भागातील नागरिकांनी शिवसेना शहर प्रमुख उमेश येरय यांच्या नेतृत्वाखाली  मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे.

   दरम्यान, काम देण्यात आलेला ठेकेदाराकडून ते काम स्वतः करण्याचा बाँण्ड करुन घ्यावा. जर तो ठेकेदार स्वतः काम करीत नसेल आणि उपठेकेदारांमार्फत करीत असेल तर अशा ठेकेदारांना नगरपरिषदेचे काळ्या यादीत टाकावे. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

    नवीन म्हाडा काँलनी ते आनंदवाडी आणि कँम्पकाँर्नर परीसरातील नागरिकांनी वेंगुर्ला नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनात, वेंगुर्ला शहरात चालू असलेल्या श्री देव रामेश्वर मंदिर पासून पॉवर हाऊसपर्यंत रस्ते खोदाई करुन पाईप लाईन व विद्युत वाहिनी टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे महिनाभर नागरीकांना वहातूक कोंडी व धुळीचे साम्राज्य झाल्यामुळे प्रदुषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच बुधवार दि. ७ मे रोजी पॉवर हाऊस जवळ हॉटेल उत्तम भुवन यांचे समोरील मुख्य गटाराच्या साईड पट्टीवरुन गाडी जाऊन गटार खचून गाडी अपघात झाला. सुमारे ३ तास वाहतूक कोंडी झाली. सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. मुख्य गटाराला काँक्रीटीकरणाचे केलेले काम निकृष्ट असल्याचे या अपघातामुळे उघडकीस आले आहे. हे काम सुरू असताना कांही नागरिकांनी सदर का निकृष्ट होत असल्याच्या तक्रारी वेळीच केलेल्या होत्या. पण तत्कालीन मुख्याधिकारी यांचेकडून दुर्लक्ष झाले असल्याचे नागरिकांनी मुख्याधिकारी यांचेकडे स्पष्ट केले. त्यामुळे शहरात झालेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार आहोत. कारण अपघात होवून दोन दिवस झाले तरी त्या ठिकाणची परिस्थिती आपण प्रत्यक्ष वस्तुस्थितीची पहाणी करुन समजून घेतलेली नाही.

   तरी लवकरच जाग्यावर येवून प्रत्यक्ष कामाची पहाणी करुन ज्या ठेकेदाराने गटारावर काँक्रीटकरण केले, त्याच्याकडून पुन्हा काम करुन घेण्यात यावे. तसेच वेंगुर्ला शहरामध्ये चालू असलेली जवळजवळ ९० टक्के कामे ही उपठेकेदार करत असतात हे आपणांस माहित असून सुध्दा आपण जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहात.

    तरी यापुढील सर्व कामे मूळ ठेकेदाराकडूनच करुन घ्यावे. उपठेकेदार काम करीत असेल तर ते काम थांबविण्यात येईल. व त्याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील. आपला या कामांकडे लक्ष नसल्याने सर्व नागरिक नाराज आहेत. तरी त्वरीत यावर अंमलबजावणी करावी. अशी मागणी केली आहे. 

  या प्रकरणी त्याभागातील ५० नागरिकांनी सर्वप्रथम शिवसेना वेंगुर्ला शहर प्रमुख उमेश येरम यांची भेट घेतली. व निकृष्ट कामामुळे होणारा त्रास याबाबत लेखी निवेदन देत या बाबत न्याय देण्याची मागणी नागरिकांनी केली. त्यानुसार शिवसेना वेंगुर्ला शहर प्रमुख उमेश येरम यांच्या नेतृत्वाखाली वेंगुर्ले नगरपरिषदेत जाऊन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांची भेट घेत सविस्तर चर्चा करीत लेखी निवेदन सादर करण्यात आले.

    सदर निकृष्ट कामाबाबतचे लेखी निवेदनावर ५० नागरिकांच्या सह्या असून मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांना सादर करताना शिवसेना शहर प्रमुख उमेश येरम, उत्तम भुवन हाँटेलचे मालक सुशील परब, युवासेना शहर प्रमुख संतोष परब, राजू परब, मनिष रेवणकर, सिल्वान डिसोजा, निलेश वराडकर, देविदास वालावलकर,जयेश गावडे आदी नागरिक उपस्थित होते.