कुडाळच्या प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी बजावणार सावंतवाडी कॉटेजमध्ये सेवा

राजू मसुरकर यांची माहिती
Edited by: विनायक गावस
Published on: August 22, 2023 18:19 PM
views 150  views

सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथील रक्तपेढी विभागातील कामकाजाच्या दृष्टीने ग्रामीण रुग्णालय कुडाळ येथे कार्यरत असलेल्या प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्रीमती प्रणाली चिपकर यांना पुढील आदेश होईपर्यंत उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथील रक्तपेढी विभागात कामकाज करण्यासाठी पाठविण्यात यावे असे आदेश जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी ग्रामीण रूग्णालय कुडाळच्या वैद्यकीय अधिक्षकांना दिले आहेत. याबाबतची माहिती जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी दिली आहे. 


ह्युमन राईट्सचे जिल्हाध्यक्ष अजित सुभेदार व जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. उपसंचालक भिमसेन कांबळे यांच्याशी संपर्क साधून याबाबतची मागणी केली होती. तसेच युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी देखील रक्तपेढीतील रिक्तपदे भरावीत यासाठी आंदोलन छेडले होते. रक्तपेढीतील लॅब टेक्निशीयनसह इतर पद रिक्त असल्यानं येथील कर्मचाऱ्यांवर अतिरीक्त ताण येत होता. दोन महिन्यांपूर्वी प्रयोगशाळा अधिकारी यांना हजर होण्याचे आदेश दिले होते. परंतु, काही तांत्रिक कारणांमुळे त्या हजर झाल्या नाहीत.‌ यानंतर ह्युमन राईट्सचे जिल्हाध्यक्ष अजित सुभेदार व जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी लक्ष वेधल्यानंतर अखेर ग्रामीण रुग्णालय कुडाळ येथे कार्यरत असलेल्या प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्रीमती प्रणाली चिपकर यांना उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथील रक्तपेढी विभागात कामकाज करण्यासाठी पाठविण्यात यावे असे आदेश जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिले आहेत. याबाबत उपसंचाल कोल्हापूर भिमसेन कांबळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पाटील व डॉ.सुबोध इंगळे यांचे राजू मसुरकर यांनी आभार मानले आहेत. रात्रीबेरात्री सर्पदंश झालेले रूग्ण उपजिल्हा रुग्णालयात येत होते. त्यावेळी तपासणी करण्यासाठी ऑंन कॉल कर्मचाऱ्यांना बोलवण्यात येत होत. ही परिस्थिती राजू मसुरकर यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर हे आदेश जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिले आहेत.