
दोडामार्ग : आयी, माटणे, वझरे, तळेखोल आणि विर्डी या पंचक्रोशीतील मुख्य रस्त्यालगत 11 केव्ही ओव्हरहेड वीज लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. या कामात गंभीर त्रुटी व बेपर्वाई होत असल्याचा आरोप ‘जागरूक नागरिक मंच – आयी पंचक्रोशी’ यांनी केला आहे. या त्रुटींमुळे नागरिकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा मंचाने दिला आहे.
मंचाच्या मते या कामात निकृष्ट दर्जाचे पोल वापरले गेले आहेत. 11 केव्ही लाईनसाठी किमान 6 इंच रुंद आणि 11 मीटर उंचीचे आयबीम पोल आवश्यक असताना येथे केवळ 4 इंच रुंद आणि 9 मीटर उंचीचे पोल बसवले गेले आहेत. हे पोल आधीच गंजायला सुरुवात झाली असून कमी क्षमतेमुळे ते लवकर वाकण्याचा धोका आहे.
संपूर्ण लाईन रस्त्याच्या कडेला जात असताना तिला गार्डिंग दिलेली नाही. त्यामुळे लाईन तुटल्यास ती थेट लोकांवर पडण्याची शक्यता आहे. तसेच प्रत्येक पोलला आवश्यक असलेली योग्य अर्थिंग न करता केवळ 70 सेंटीमीटर लांबीचा पाईप जमिनीत ठोकण्यात आला आहे. कोळसा व मीठ न वापरल्यामुळे पोलला लाईन टच झाल्यास ऑटोमॅटिक ट्रिपिंग न होता पोल 11 हजार व्होल्टने चार्ज होऊ शकतो, असा इशारा मंचाने दिला.
पूर्वीची लाईन जंगलातून जात असल्याने वारंवार वीज खंडित होत होती. तो त्रास टाळण्यासाठी रस्त्यालगत नवीन लाईन घालण्याचा निर्णय घेतला गेला. मात्र या नव्या कामातील त्रुटीमुळे “आजारापेक्षा औषध भयंकर” अशी स्थिती निर्माण होत असल्याचे मंचाने स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर अधिकारी आणि ठेकेदारांनी जनतेच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन तातडीने दुरुस्तीची पावले उचलावीत, असे आवाहन जागरूक नागरिक मंचाने केले आहे.










