
सावंतवाडी : ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि स्वातंत्र्यसेनानी वसंत उर्फ अण्णा केसरकर यांचा ८० वा वाढदिवस अर्थान सथाभिषेक सोहळा सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण आणि ८० सुपारी रोपांचे वाटप यावेळी करण्यात आले. अण्णा केसरकर यांच्या कारिवडे येथील निवासस्थानी हा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख, सीमाभाग लढ्यासह सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील अण्णा केसरकर यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष जेष्ठ पत्रकार गजानन नाईक, मोहन जाधव, अभिमन्यू लोंढे, पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, माजी अध्यक्ष विजय देसाई, राजेश मोंडकर, व्हॉइस मीडियाचे जिल्हाध्यक्ष प्रा. रूपेश पाटील, ज्येष्ठ महिला पत्रकार मंगल कामत आदींनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, मंत्री छगन भुजबळ यांनी फोनवरून अण्णांना शुभेच्छा दिल्या. तसेच उपस्थित सर्व पत्रकार मित्रांनी देखील अण्णांना शुभेच्छा दिल्या. केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांना श्री. केसरकर यांच्या हस्ते सुपारीच्या रोपांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ, मराठी पत्रकार परिषद आणि सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने अण्णा केसरकर यांचा सन्मान करण्यात आला. अण्णा केसरकर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करताना आजच्या पत्रकारितेत टिकून राहून निर्भिड व निःपक्षपातीपणे पत्रकारिता कशी करावी, याविषयी मार्गदर्शन केले. संघर्ष आणि संकटाला न घाबरता धीरोदात्तपणे तोंड देण्याचा संदेशही त्यांनी दिला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू तावडे यांनी केले, सूत्रसंचालन विनायक गांवस यांनी केले तर हर्षवर्धन धारणकर यांनी आभार मानले.यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, मराठी पत्रकार परिषदेचे माजी राज्य अध्यक्ष गजानन नाईक, सचिव बाळासाहेब खडपकर, उपाध्यक्ष संतोष राऊळ, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, माजी तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र पवार, विजय देसाई, राजेश मोंडकर, राजू तावडे, प्रा. रुपेश पाटील, उपाध्यक्ष हर्षवर्धन धारणकर, मोहन जाधव, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, सहसचिव विनायक गांवस, दीपक गांवकर, नागेश पाटील, नरेंद्र देशपांडे, मंगल कामत, उमेश सावंत, लुमा जाधव, रूपेश हिराप, अजित दळवी, संतोष परब, शैलैश मयेकर, आनंद धोंड, सिद्धेश सावंत, अनुजा कुडतरकर, जतिन भिसे, अनिल कुडाळकर, प्रशांत सावंत, साबाजी परब, सचिन केसरकर व त्यांचे कुटुंबिय आदी उपस्थित होते.