काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकास सावंत यांचं निधन

Edited by: विनायक गांवस
Published on: July 15, 2025 14:23 PM
views 635  views

सावंतवाडी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विकास सावंत यांचे मंगळवारी निधन झाले. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माजी मंत्री, भाईसाहेब सावंत यांचे ते सुपुत्र होते. 

गेली तीन दशके जिल्ह्यातील शैक्षणिक, सामाजिक, सहकार, आरोग्य, राजकारण अशा सर्वच क्षेत्रात ते कार्यरत होते. शहरापासून दुर्गम खेड्यात शिक्षणाचा ज्ञानदीप लावण्याचे काम शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून त्यांनी केले. सावंतवाडीतील राणी पार्वतीदेवी हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, दोडामार्ग इंग्लिशस्कूल व ज्युनिअर कॉलेज, शांतिनिकेतन व चौकूळ हायस्कूल अशी ज्ञानमंदिरे त्यांनी सुरू केली होती. गेली ३५ वर्ष ते शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष होते. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे (शिखर बँक) उपाध्यक्ष, सिंधुदुर्ग बँकेचे संचालक म्हणून त्यांनी सहकार क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला होता. कै. भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाचे ते उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. जिल्हा परिषदचे अर्थ व बांधकाम सभापती म्हणून त्यांनी वेगळी छाप सोडली होती. १९८९ मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. ते आजन्म राष्ट्रीय कॉग्रेसच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहिले. त्यांना पक्षाने १९९९ ची सावंतवाडी विधानसभेची उमेदवारी दिली होती. नुकताच कै. भाईसाहेब सावंत जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त त्यांच्या माजगाव येथील प्रेरणा या समाधीस्थळी विकास सावंत यांच्या संकल्पनेतून व शि.प्र. मंडळाच्या माध्यमातून अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला होता. अलिकडेच २० जून रोजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून विकास सावंत यांचा ६२ वा वाढदिवस येथील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला होता. यावेळी त्यांनी मनोगतात आपला जीवनपट उपस्थितांसमोर मांडला होता. त्यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांचे ते शेवटचे मनोगत अनेकांनी आठवून शोक व्यक्त केला. 

कॉग्रेसच्या विचारधारेशी एकनिष्ठ असलेले विकास सावंत हे अजातशत्रू व्यक्तीमत्व होते. सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी त्यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध होते‌. महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांशी त्यांचे निकटचे संबंध होते‌. सामाजिक जीवनात त्यांनी पक्षीय राजकारण आणले नाही. राजकीय वा वैयक्तिक टीका केली नाही. त्यामुळे सर्व क्षेत्रात त्यांचा वेगळा चाहता वर्ग निर्माण झाला होता. काँग्रेसच्या विचारांशी एकनिष्ठ असलेल्या या नेत्याने आज अखेरचा श्वास घेतला. राहत्या घरी अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, नात, नातू असा मोठा परिवार आहे. युवा नेते विक्रांत सावंत यांचे ते वडील होत. 

त्यांच्या निधनाची वार्ता समजातच उपजिल्हा रुग्णालयात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी गर्दी केली. शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. यावेळी रूग्णालयामध्ये माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर, सी.एल. नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, डॉ. दिनेश नागवेकर, संदीप कुडतरकर, उमाकांत वारंग, बाबल आल्मेडा, महेंद्र सांगेलकर, रवींद्र म्हापसेकर, हर्षवर्धन धारणकर, सतिश बागवे, शैलेश नाईक, नकुल पार्सेकर, अजय सावंत, मनोज नाईक, पुंडलिक दळवी, आनंद नेवगी, प्रेमानंद देसाई, मेघश्याम काजरेकर, सुधीर मल्हार, सुरेश म्हसकर, हेमंत मराठे, समीर परब, नितिन कुडतरकर आदी उपस्थित होते‌. तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी  रूग्णालयात गर्दी केली होती.

विकास सावंत यांचे सुपुत्र विक्रांत सावंत हे काही कामानिमित्त परदेशात असल्याने ते गावी परतल्यानंतर उद्या बुधवार दिनांक १६ जुलै रोजी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.‌ तत्पूर्वी दुपारी १२ वाजता माजगाव येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे.

बुधवारी होणार अंत्यसंस्कार

उद्या बुधवार सकाळी ९ ते १० वा. येथील राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या सभागृहात विकास सावंत यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तदनंतर १०-१२ वा. या वेळेत माजगाव येथील त्यांच्या निवासस्थानी पार्थिव ठेवले जाणार आहे. दुपारी १२ वा. माजगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते, राजू मसूरकर यांनी दिली आहे.