
ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं निधन झालं. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली. विज्ञान आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये नारळीकरांनी उत्तुंग कामगिरी केली. त्यांच्या निधनानंतर ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण बांदेकर यांनी त्यांना आदरांजली वाहीलीय.
प्रवीण बांदेकर लिहितात, विज्ञाननिष्ठ असणं ही फारच दुर्मीळ आणि तितकीच अवघड गोष्ट बनून गेलेल्या या काळात तुमच्यासारख्यांचं असणं हाही एक दिलासा होता. विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न महत्त्वाचे आहेत. मराठीत विज्ञानसाहित्य हा genre रुजावा, बहरावा, म्हणून तुम्ही दिलेलं भरीव योगदानही विसरता येणार नाही. तुमच्या एका मुलाखतीत तुम्ही तुमच्या कन्येला सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी नवी स्कुटी खरेदी करून दिल्याचा प्रसंग सांगितला होता. बाकी लोकांचं सोडा, पण अमावस्येच्या दिवशी तर आमचे विज्ञानाचे शिक्षकही आपल्या गाड्यांना लिंबूमिरच्या बांधून येतात. अशा काळात, अशा समाजात या आमच्या दगडाधोंड्यांच्या देशात आपण अशी काही अश्रद्ध कृती करणं किती धक्कादायक असू शकतं! विवेक आणि संवेदनशीलता, व्यासंग आणि नम्रपणा, ज्ञानी, विद्वान असणं आणि कृतिशीलपणे समाजाशीही जोडून असणं, सर्वसामान्यांविषयी आस्था बाळगून असणं, आंतरराष्ट्रीय कीर्ती असूनही जमिनीवर असणं, हे गुण अभावानेच आजकाल दिसतात.
बथ्थड आणि बधीर होत चाललेल्या काळात आपल्याला संभाव्य पशुत्वापासून, अंधत्वापासून वाचवू पाहणारा एक माणूस आपल्यातून निघून गेला, हेच आता कुठेतरी आत खोलवर टोचत राहील...