SPKत केमिस्ट्री विभागाकडून 'फार्मा फ्युचर'वर चर्चासत्र

Edited by: विनायक गांवस
Published on: February 06, 2025 12:01 PM
views 246  views

सावंतवाडी : श्री पंचम खेमराज महाविद्यालय (स्वायत्त) च्या रसायनशास्त्र विभागामार्फत "फार्मा फ्युचर: नेविगेटिंग द अपॉर्च्युनिटीज अँड चॅलेंजेस" या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चा सत्राचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन राणीसाहेब शुभदादेवी भोसले  यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर चर्चासत्राचे मार्गदर्शक फार्मा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट गडहिंग्लज संस्थापक रुपेश पाटील तसेच महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा. एम. ए. ठाकुर , रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. डी. बी. शिंदे, समन्वयक डॉ. यु.सी. पाटील तसेच रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या चर्चासत्रातील उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी फार्मा उद्योगातील नवीन तंत्रज्ञान, औषधनिर्माण प्रक्रिया आणि करिअरच्या विविध संधी शोधून त्यातून नवनवीन कौशल्य व ज्ञानाचा विस्तार करावा असे आवाहन राणीसाहेब शुभदादेवी भोंसले यांनी केले. चर्चासत्राचे मार्गदर्शक रुपेश पाटील यांनी फार्मा क्षेत्रांतील नवनवीन संधी आणि आव्हानांवर चर्चा केली आणि या क्षेत्रातील अभ्यासक्रम आणि संशोधनाच्या दिशेने विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे हा उद्देश समोर ठेवून मार्गदर्शन केले. सर्व संशोधक विद्यार्थ्यांनी फार्मा क्षेत्रांतील सद्यस्थिती आणि भविष्य तसेच मुलाखत, उद्योग क्षेत्रातील कामाचे विविध प्रकार, पॅकेजेस यावर विशेष लक्ष देऊन त्यासाठी स्किल्स मिळवून यश मिळवावे असे मत मांडले.

चर्चासत्राचे प्रास्ताविक रसायनशास्त्र विभागप्रमुख  डॉ. डी बी शिंदे यांनी  केले तर आभार प्रदर्शन डॉ. यु.सी पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी रसायनशास्त्र विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संशोधक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.