सावंतवाडी : भोसले नॉलेज सिटी येथे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर चर्चासत्र नुकतेच पार पडले. या चर्चासत्राचे आयोजन भोसले नॉलेज सिटी, सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ आणि कोकण विद्यार्थी निधी ट्रस्ट यांनी संयुक्तपणे केले होते. यावेळी विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव प्राध्यापक डॉ. मनीष जोशी यांनी मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून विविध शैक्षणिक मुद्द्यांवर प्रकाश टाकला. नवीन शैक्षणिक धोरणातील महत्त्वपूर्ण बदल आणि त्यांचा विद्यार्थी व शिक्षण क्षेत्रावर होणारा परिणाम याबाबत त्यांनी विस्तृत माहिती दिली. उपस्थित प्राध्यापक व प्राचार्य यांनी विचारलेल्या शंकांचे निरसनही केले.
अभाविपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.मंदार भानुशे यांनी या चर्चासत्राचा सारांश सांगताना सर्वसमावेशक शिक्षण प्रणालीचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, नवीन धोरणामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी मिळावी यावर भर देण्यात आला आहे. कार्यक्रमासाठी विविध शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी, यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पंचम खेमराज महाविद्यालय, भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालय, स.का.पाटील महाविद्यालय, आय.आय.टी, मुंबई, आर.ए.पोतदार वैद्यकीय महाविद्यालय मुंबई, तसेच वेंगुर्ला, वैभववाडी, दोडामार्ग, शिरगाव येथील शैक्षणिक संस्थांचा समावेश होता.
यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, युवराज लखमराजे भोसले उपस्थित होते. भोसले फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.विजय जगताप आणि भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ.रमण बाणे यांनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले. सूत्रसंचालन प्रा.गायत्री आठलेकर यांनी केले.