
संगमेश्वर : कोकण भूमी कृषी पर्यटन सहकारी संस्था कोकण प्रांत आणि परशुराम एज्यूकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने 'आंतरराष्ट्रीय आयात निर्यात व्यापार संधी आणि आव्हाने' या विषयावर नुकतेच प्रशिक्षण दि ड्राईव्ह इन रेस्टॉरंट धामणी संगमेश्वर येथे संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी नवनिर्माण महाविद्यालयातील विद्यार्थी व कोकणात विविध प्रकारचे उत्पादन करणारे शेतकरी, उद्योजक उपस्थित होते.
या प्रशिक्षण सत्रामध्ये दुबई येथून आलेले एक्झीम अकॅडमीचे संचालक किरण वाघ यांनी उद्योजकांना निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची तरतूद व पूर्तता तसेच निर्यात प्रक्रिया पद्धती याबाबत विस्तृतपणे मार्गदर्शन केले. किरण वाघ हे एक आंतरराष्ट्रीय आयात-निर्यात प्रशिक्षक आणि दुबई, यूएई येथे कस्टम हाउस एजंट (CHA) म्हणून कार्यरत आहेत.
यानंतर कोकण भूमी कृषी पर्यटन सहकारी संस्थेच्या अध्यक्ष डॉ. मीनल ओक यांनी कृषी पर्यटन ही संकल्पना स्पष्ट करून कोकणातील निसर्गनिर्मित रानमेवा, रानभाज्या तसेच कोकणची शक्तीस्थळं, मत्स्य आणि फळ प्रक्रिया उद्योग हेच कोकणचे भविष्य आहे असे उदाहरणादाखल नमूद केले. कोकणात मनुष्यबळाची आवश्यकता आहे आणि विद्यार्थ्यांनी कोकणात पिकणाऱ्या, उत्पादित होणाऱ्या विषयांकड प्राधान्याने लक्ष द्यावे, या विषयांचा अभ्यास करावा आणि कोकणी उत्पादन आणि पर्यटन हा आपला उदरनिर्वाह, पेशा, नोकरी, उद्योग मार्ग स्वीकारावा असे आवाहन केले.
कोकणी उत्पादन आणि कोकण पर्यटन याचे महत्त्व आणि भविष्य विशद केले. डॉ. मीनल ओक यांनी कोंकण पर्यटन या विषयात पीएचडी केलेली आहे. या कार्यक्रमांमध्ये युवा उद्योजक अमोल पाटणे यांनी आंबापोळी, आंबा रोल, फणसाचे गरे असे स्वतः उत्पादित केलेले घटक प्रदर्शनी ठेवून निर्यातदारांना दाखवले. तसेच ऋषिकेश ठसाळे यांनी बांबूचे विविध प्रोडक्ट्स, मृणाल जोशी यांनी हळद आवळा कारले यांचे स्वतः उत्पादित केलेले घटक याबाबत सर्वांना माहिती दिली. यावेळी संस्थेचे सचिव अमोल लोध, उपाध्यक्ष प्रमोद केळकर तसेच संचालक नंदादीप पालशेतकर उपस्थित होते.