स्व. विद्याधर भागवत स्मृती काव्यवाचन स्पर्धेला प्रतिसाद..!

Edited by: विनायक गावस
Published on: August 27, 2023 18:30 PM
views 98  views

सावंतवाडी : स्व. विद्याधर भागवत स्मृती काव्यवाचन स्पर्धा सावंतवाडी शहरातील श्रीराम वाचन मंदिरात रविवारी संपन्न झाल्या. आरती मासिक, श्रीराम वाचन मंदिर व कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडी या संस्थांच्या वतीने ज्येष्ठ कवी, कादंबरीकार व कोकणभूषण स्वर्गीय विद्याधर भागवत यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून स्व. विद्याधर भागवत स्मृती स्वरचित काव्यवाचन स्पर्धा रविवारी संपन्न झाल्या.

यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कवी व साहित्यिक वाय. पी. नाईक, ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जी. ए. बुवा, ज्येष्ठ साहित्यिका उषा परब, प्रभाकर भागवत, भरत गावडे, कोकण मराठी साहित्य परिषदेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष ॲड. संतोष सावंत, विट्ठल कदम, परीक्षक प्रा. रुपेश पाटील, संध्या कदम आदी उपस्थित होते. प्रारंभी नुकत्याच स्वर्गवासी झालेल्या महणीय व्यक्ती, कलावंत यांना उपस्थितांनी आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर स्वर्गीय कवी विद्याधर भागवत यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून काव्यवाचन स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. 

दरम्यान, अध्यक्ष वाय. पी. नाईक म्हणाले कोकणाने अनेक महान साहित्यिक, कवी मराठी साहित्य विश्वाला दिले आहेत. येथील लाल माती आणि निसर्गरम्य सौंदर्य लाभलेला सह्याद्री, फेसाळणाऱ्या समुद्राच्या लाटा या साऱ्यांमुळे येथील साहित्यिकांचे साहित्य बहरत जाते. असे सांगत त्यांनी काव्यवाचन स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उषा परब यांनी सादर केले. पाहुण्यांचा परिचय कवी विठ्ठल कदम यांनी करून दिला. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, ॲड. नकुल पार्सेकर, कवी दीपक पटेकर, पत्रकार विनायक गांवस, सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस. आर. मांगले यांसह अनेक साहित्य प्रेमी व कवी उपस्थित होते.

या काव्य स्पर्धेत नंदा चव्हाण यांनी प्रथम तर मंगल नाईक-जोशी यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक विभागून देण्यात आले. दत्ताराम सावंत व आदिती मसुरकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला तर उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक प्रा. मृण्मयी पोकळे व पार्थ सावंत यांनी उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक मिळविले. हे पारितोषिक ॲड. प्रकाश परब यांनी प्रायोजित केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. प्रतिभा चव्हाण यांनी केले. 

दरम्यान, कार्यक्रमात अध्यक्ष व ज्येष्ठ कवी वाय. पी. नाईक तसेच नवीन शैक्षणिक धोरणावर सुकाणू समितीच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल भरत गावडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

दरम्यान या काव्य वाचन स्पर्धेत रूपाली माठेकर, पार्थ सावंत, संदेश धुरी, अजित राऊळ, नकुल पारसेकर, प्रज्ञा मातोंडकर, ऋतुजा सावंत-भोसले, गौरी कुलकर्णी, आशा मुळीक, तारामती पदमपल्ले, मंगल नाईक-जोशी, आदिती मसुरकर, मुकुंद मडगावकर, स्नेहा नारिंगनेकर, सिद्धी बोंद्रे, सुधीर धुमे, प्रा. मृण्मयी पोकळे, सुरेश काळे, शरद पाटयेकर, दत्ताराम सावंत, सोमा गावडे, रामदास पारकर, नंदा सावंत, वैभव रांजीवने, रविकांत जाधव, राजेंद्र गोसावी, संगीता सोनटक्के, संजय पडते, हर्षा बेळगावकर यांनी आपली काव्य प्रतिभा सादर करीत साहित्य प्रेमींची मने जिंकली.

अंतिम निकाल

1) नंदा चव्हाण - प्रथम , 2) मंगल नाईक -जोशी - द्वितीय. 3) दत्ताराम सावंत व आदिती मसुरकर - तृतीय विभागून

4) मृण्मयी पोकळे - उत्तेजनार्थ प्रथम, 5) पार्थ सावंत - उत्तेजनार्थ व्दितीय