शरद पवार अध्यक्ष असलेल्या संस्थेवर ॲन्थोनी डिसोझांची निवड

Edited by: दिपेश परब
Published on: December 19, 2023 11:32 AM
views 87  views

वेंगुर्ले : आशिया खंडात अग्रगण्य ४२ सिनीअर कॉलेजेस, ४५३ माध्यमिक उच्चमाध्यमिक शाळा, ०७ डि.एड कॉलेज, ६७ प्राथमिक शाळा, ५४ इंग्लिश मिडीम व पुर्वप्राथमिक, ८३ वसतिगृहे, ०७ प्रशासकीय कार्यालये, ०८ आश्रमशाळा, ०३ ITI, इतर १२ व १ विद्यापिठ अशी एकूण ७३७ युनिट असणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभाग सांगलीच्या सहाय्यक विभागीय अधिकारी पदी रयत शिक्षण संस्थेचे लाइफ वर्कर तथा श्री शिवाजी हायस्कूल तुळसचे मुख्याध्यापक ॲॅन्थोनी ॲलेक्स डिसोझा यांची निवड जाहिर झाली आहे. त्यांचे कार्यक्षेत्र सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी,सिंधुदुर्ग व बेळगाव या पाच जिल्ह्यासाठी असून विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री व देशाचे माजी संरक्षण व कृषी मंत्री असलेले शरद पवार हे अध्यक्ष असलेल्या संस्थेवर अँन्थोनी डिसोझा यांची निवड झाल्याने जिल्हयात सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.


 सिंधुदुर्ग जिल्हयातील वेंगुर्ले उभादांडा गावचे सुपुत्र व श्री शिवाजी हायस्कूल तुळसचे मुख्याध्यापक ॲन्थोनी ॲलेक्स डिसोझा हे रयत शिक्षण संस्थेत गेली ३६ वर्ष कार्यरत आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी हायस्कूल, तुळस येथे १ ऑक्टो. १९८७ मध्ये उपशिक्षक म्हणून नेमणूकीने नोकरीत प्रवेश झाला. त्यानंतर बी.एड. स्केल प्रमोशन त्यांना १९९४ ला छत्रपती शिवाजी विद्यालय, वावंजे,(पनवेल) जि. रायगड येथे मिळाले. रयत शिक्षण संस्थेच्या लाईफ वर्कर बोर्डात निवड सन २०१६ मध्ये झाली. रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य म्हणून सन २०२० मध्ये निवड झाली. श्री पद्माराजे विद्यालय,शिरोळ (कोल्हापूर) येथून बढतीने २९ ऑगस्ट २०२३ रोजी मुख्याध्यापक म्हणून श्री शिवाजी हायस्कूल तुळस वेंगुर्ला येथे रुजू झाले. १ जानेवारी २०२४ पासून ३१ मे २०२६ या कालावधीसाठी  रयत शिक्षण संस्थेच्या, दक्षिण विभाग, सांगलीच्या सहाय्यक विभागीय अधिकारीपदी त्यांची निवड जाहिर झालेली आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी रयत शिक्षण संस्था ज्या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आहेत. डायरेक्टर, बोर्ड मेंबर उपमुख्यमंत्री पद भूषविणाऱ्या अजित पवार व चेअरमन चंद्रकांत दळवी व सचिव पदी विकास देशमुख, सहसचिव ज्ञानदेव म्हस्के व बी.एन.पवार संघटक डॉ.अनिल पाटील, व्हाइस चेअरमन अँड. भगिरथ शिंदे, दिलीप वळसे-पाटील,अँड.रविंद्र पवार,रामशेठ ठाकूर, मिनाताई जगधने, डॉ.विश्वजीत कदम, महेंद्र लाड, जे.के. जाधव, अजित पाटील, श्रीमती सरोज नारायण पाटील, प्रभाकर देशमुख, एम.बी.शेख,विलास महाडीक, डॉ.गणेश ठाकूर,विनोदकुमार संकपाळ या सर्व नामवंत व्यक्तीच्या कार्यरत असणाऱ्या रयत शिक्षण संस्थेत सिंधुदुर्ग जिल्हयाचे सुपुत्र ॲन्थोनी ॲलेक्स डिसोझा यांची एकमेव निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यांत आला.कॉलेज जीवनापासून शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात नेतृत्व करीत काम करणारे ॲन्थोनी डिसोझा यांनी अखिल भारतीय विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्षपद, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष, मतदारसंघ अध्यक्षपद, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्षपद अशी महत्वाची पदे भूषवून प्रत्येक पदाला न्याय दिला. त्यांची रयत शिक्षण संस्थेच्या, दक्षिण विभाग,सांगलीच्या सहाय्यक विभागीय अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल जिल्ह्यातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.