विभाग नियंत्रक - अधिकाऱ्यांच्या असंवेदनशील कारभारामुळे एसटी कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण : गणेश गावकर

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 03, 2023 15:58 PM
views 177  views

देवगड : विभाग नियंत्रक व अधिकारी यांच्या असंवेदनशील कारभारामुळे  एस. टी. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न भेडसावत असल्याची प्रतिक्रिया, एस. टी. कामगार सेना देवगड तालुकाप्रमुख गणेश गावकर यांनी व्यक्त केली आहे. दिनांक ३० सप्टेंबर रोजी देवगड तालुक्यातील तांबळडेग कणकवली प्रवासी फेरीचा मिठबाव येथे टायर पंक्चर झाला हा एस. टी. चा टायर बदलताना लावलेला जॅक तुटुन अपघात झाल्याने प्रकाश वसंत पवार हे एस.टी. चालक गंभीर जखमी झालेत.

त्यानंतर १०८ रुग्णवाहिकेने ने त्यांना प्रथम देवगड आणि तिथून ओरोस येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. हा अपघात प्राणांतिक होता. आताही सदर वाहकाला अधिक उपचारासाठी कोल्हापूर किंवा गोवा येथे नेण्यासाठी डॉक्टरांनी सांगितले. या सर्व प्रक्रियेत त्या वाहकाला हॉस्पिटलला जाऊन भेटून त्याला मानसिक आधार देण्याच कामही विभाग नियंत्रक, विभागीय वाहतूक अधिकारी, सुरक्षा अधिकारी, यांनी केलं नाही.

आगारप्रमुख निलेश लाड यांनी खात्याच्या प्रचलित नियमाप्रमाणे प्रक्रिया पूर्ण केली,पण सदर आपल्या कर्मचाऱ्याला एवढा मोठा अपघात होऊनही साधं हॉस्पिटल ला जाऊन विचारपूस करण्याची माणुसकी पण विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे नसणं हेच या विभागातील राज्य परिवहन च्या कर्मचाऱ्यांच दुर्दैव आहे. गाड्याची परिस्थिती न बोललेलीच बरी पण त्यातूनही वाटेत गाडी पंक्चर झाल्यावर टायर बदलण्यासाठी वापरण्यात येणारे जॅक,टॉमी हे ही पुराने जमानेके आहेत.त्याचाच फटका पवार यांना बसला.जर तो जॅक सुस्थितीत असला असता तर आज ही वेळ वाहक पवार यांच्यावर आली नसल्याच त्यांनी सांगितल. 

पालकमंत्र्यांनी योग्य पद्धतीने अश्या असंवेदनशील आणि प्रशासनावर पकड नसलेल्या अधिकाऱ्यांवर स्वतःचा वचक ठेवला नाही तर हे अधिकारी असेच निर्ढावल्यासारखे राहून कर्मचाऱ्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास देत राहतील. अश्या अधिकाऱ्यांना तातडीने जिल्ह्याबाहेर पाठविणे आवश्यक आहे. येत्या १५ दिवसात सर्व जॅक, टॉमी, स्टेपनी, वर्कशॉप मध्ये वापरण्यात येणाऱ्या मशिनरी याची तपासणी होऊन वापरण्यायोग्य नसलेले वस्तू न बदलल्यास एस.टी. कामगार सेनेच्या वतीने अशा विभाग नियंत्रकच्या विरोधात आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा गावकर यांनी दिला. ओरोस हॉस्पिटलमध्ये मध्ये आमदार वैभवजी नाईक, एस. टी. कामगार सेना जिल्हाप्रमुख अनुप नाईक यांनी पवार यांची भेट घेऊन विचारपूस केली.