
सावंतवाडी : शहरातील बंद घरात दुसऱ्यांदा चोरी करण्याचा प्रयत्न झाला आहे. सालईवाडा परिसरात हा प्रकार घडला आहे. त्यामुळे पोलिसांनी पावसाळ्यात गस्त वाढवावी अशी मागणी माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांच्याकडून करण्यात आली आहे.
सालईवाडा भागात राहणाऱ्या निवृत्त एसटी कर्मचारी सुधीर भोगटे यांच्या घरात पुन्हा एकदा चोरी झाली आहे. यात घरात असलेली चांदीची भांडी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. काल हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान मुंबईत राहत असलेले श्री. भोगटे आज आल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली.
पोलिस निरिक्षक ऋषिकेश अधिकारी, उपनिरिक्षक सुरज पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळाला भेट देत त्या ठिकाणचा पंचमाना केला. या फ्लॅटमध्ये भोगटे राहतात. मात्र, ते सध्या मुंबईत असल्यानं ठिकाणी येवून जावून असतात. घरात कुणी नाही याची संधी साधून चोरट्याने त्यांच्या घरात चोरीचा प्रयत्न केला. हा प्रकार काल उघड झाला. मात्र, ते बाहेर असल्यामुळे माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांनी त्यांना दुरध्वनीवरुन कल्पना दिली. आज ते या ठिकाणी दाखल झाल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी ठिकाणी धाव घेत पंचनामा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार घरातील कपाटात ठेवण्यात आलेली चांदीची भांडी चोरट्याने चोरली. मात्र, बाजूला असलेली पितळेची भांडी त्याच ठिकाणी ठेवून चोरटा निघून गेला. घरात काही मौल्यवान वस्तू किंवा रोकड नसल्यामुळे अन्य काही चोरीला गेले नाही. सावंतवाडी शहरातील बंद फ्लॅट, घरांची रेकी करून चोर डल्ला मारत असल्याची मध्यंतरी चर्चा होती. वारंवार तशा घटना घडत होत्या. त्यामुळे पोलीसांनी पावसाळ्यात अधिक गस्त घालावी अशी मागणी माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांनी केली आहे.