
सावंतवाडी : सावंतवाडीहुन शिरोडा येथे जाणारी एस टी बस (क्र.एम एच १४ बीटी १७९१) ही एस टी आजगाव येथे मंगळवारी रात्री ९.०० च्या सुमारास आली असता, येथील पूर्ण प्राथमिक शाळेच्या नाल्याजवळील रस्त्यावरच असलेल्या आंब्याच्या झाडाला धडक देऊन अपघातग्रस्त झाली. यावेळी चालक एस एल राणे व वाहक दोघेही सुदैवाने वाचले.अपघात एवढा भीषण होता की, एस टी चा दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. दरम्यान बसमध्ये एकही प्रवाशी नसल्याने मोठा अनर्थ टळला.
यावेळी काही स्थानिकांनी व एस टी च्या चालकाने सांगितल्याप्रमाणे समोर एक ओमनी कार रस्त्यातच उभी होती व रस्ता अरुंद होता. त्यावेळी एस टी चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला असता, ब्रेक लागेनात व समोर काही लोकही उभे होते, त्यांना वाचविण्यासाठी एस टी चालकाने स्वतःचा जीव धोक्यात घालून बाजूलाच असलेल्या झाडाच्या दिशेने बस वळवली त्यामुळे मोठा अनर्थ टळला. तर काही जणांच्या मते एस टी चा वेगच सुसाट होता त्यामुळे हा अपघात घडला. दरम्यान रस्त्यावरच असलेले ते धोकादायक झाड तोडण्यात यावे अशी मागणी वाहन धारकांमधून होत आहे.