
सावंतवाडी : शक्तीपीठ महामार्गासाठी ठाम भूमिका घेणारे माजी मंत्री, दीपक केसरकर मुंबई-गोवा महामार्ग सावंतवाडी शहरातून जात असताना गप्प बसले होते. स्वतःची जागा जाणार म्हणून झाराप-पत्रादेवी असा मार्ग झाला. यात सावंतवाडी शहराच मोठं आर्थिक नुकसान झाल. केसरकर यांच्या हेकेखोर पणामुळेच सावंतवाडीचा विकास खुंटला असा जोरदार हल्लाबोल उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख मायकल डिसोझा यांनी केला. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, विकासासाठी शक्तीपीठ महामार्गाला ठाम पाठिंबा देणारे दीपक केसरकर सावंतवाडी शहरातून मुंबई-गोवा महामार्ग जाताना का शांत राहिले. स्वतःची जागा वाचविण्यासाठी त्यांनी हा रस्ता शहराबाहेरून जाऊ दिला. बांदा-संकेश्वर मार्ग सातोळी बावळाट येथून जात असताना केवळ कागदावर तो शहरातून जाणार असं सांगितलं जातं आहे. सावंतवाडीकरांची दिशाभूल करण्याच काम श्री. केसरकर करत आहेत. आर्थिकदृष्ट्या महत्वाचे असणार ठिकाण आज शांत झालय त्याला स्थानिक आमदार कारणीभूत आहेत. शक्तीपीठ महामार्ग करून ठेकेदार, उद्योजकांचा फायदा करून घेत स्वतःच हीत साधण्याचा हेतू दीपक केसरकर यांचा असल्याचा आरोप तालुकाप्रमुख श्री. डिसोजा यांनी केला. तसेच काहीही झाले तरी या महामार्गाच्या विरोधात जनतेसोबत आम्ही खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही दिली. यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, शिवदत्त घोगळे, बाळू माळकर, विनोद ठाकूर, सरपंच आबा केरकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.