सिंधुदुर्गात कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप स्थगित

१५ दिवसांत सुधारित निवृत्तीवेतन योजनेचा निर्णय
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: April 24, 2026 20:32 PM
views 25  views

सिंधुदुर्गनगरी :  राज्य सरकारी, निमसरकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेला बेमुदत संप अखेर स्थगित करण्यात आला आहे. शासनाकडून सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेबाबत १५ दिवसांत सविस्तर शासन निर्णय काढण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या माध्यमातून कर्मचारी २१ एप्रिल २०२६ पासून संपात सहभागी झाले होते. गेल्या चार दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा रुग्णालयासमोर दररोज निदर्शने करण्यात आली.

दरम्यान, २४ एप्रिल रोजी राज्य पदाधिकारी व जिल्हा अध्यक्ष-सरचिटणीस यांची ऑनलाइन बैठक पार पडली. शासनासोबत २२ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त प्राप्त झाले असून, त्यामध्ये सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा सविस्तर शासन निर्णय १५ दिवसांत काढण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे. यासाठी शासनाने मुदतही मागितली आहे. याशिवाय, एकूण १८ मागण्यांवर शासनासोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे समन्वय समितीकडून सांगण्यात आले. तसेच, मुख्य सचिवांसोबत त्रैमासिक बैठक घेण्याचेही निश्चित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य कार्यकारिणी व सुकाणू समितीच्या सूचनांनुसार पुकारलेला बेमुदत संप स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संपात सहभागी झालेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यात आले असून, पुढील आंदोलनात १०० टक्के सहभाग नोंदवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. ही माहिती समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष राजन कोरगावकर तसेच राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सत्यवान माळवे यांनी दिली.