'आनंदोत्सव'चे भव्य उद्घाटन ; सावंतवाडीकरांसाठी खास पर्वणी

Edited by: विनायाक गांवस
Published on: April 24, 2026 19:16 PM
views 92  views

सावंतवाडी : सावंतवाडीकरांसाठी आनंदाची पर्वणी घेऊन येणाऱ्या 'आनंदोत्सव' प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे यंदा चौथे वर्ष असून या यशस्वी ४ वर्षपूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन युवराज लखमराजे भोंसले व जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. तब्बल ७५ स्टॉल या निमित्ताने थाटले असून आरपीडीच्या पटांगणात भरलेला हा उत्सव सावंतवाडीकरांसाठी ही खास पर्वणी ठरत आहे. 

फीत कापून या महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्रीफळ फोडून प्रारंभ करण्यात आला. यावेळी दरवर्षी हा महोत्सव असाच मोठा होऊदे याची व्याप्ती अधिक वाढू देत अस मत जि.प. सदस्य विक्रांत सावंत यांनी व्यक्त केले. तसेच युवराज लखमराजे भोंसले म्हणाले, आनंदोत्सवचा चढता आलेख बघून अभिमान वाटत आहे. आपला उत्कर्ष उत्तरोत्तर होत राहूदेत अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. ‌

दरम्यान, स्थानिक उद्योजकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी 'आनंदोत्सव' टीमने गेल्या चार वर्षांपासून सातत्य ठेवले आहे. यंदाही या प्रदर्शनात विविध गृहोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ आणि आकर्षक उत्पादनांची विक्री व प्रदर्शन होत आहे. गेली चार वर्ष हा आनंदोत्सव भरवत असून यंदा जवळजवळ ७५ स्टॉल धारकांना आम्ही संधी देऊ शकलो याचा आनंद असल्याची भावना संयोजिका पौर्णिमा सावंत यांनी व्यक्त केली. आर. पी. डी. हायस्कूलच्या मैदानात हे प्रदर्शन दि. २४ एप्रिल ते २६ एप्रिल या कालावधीत सायंकाळी ४.०० ते रात्री १०.०० या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन आज करण्यात आले. याप्रसंगी सावंतवाडी संस्थानाचे युवराज लखमराजे भोसले, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, संयोजिका पौर्णिमा सावंत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड‌. प्रणिता कोटकर यांनी केले.