
सावंतवाडी : शक्तीपीठ महामार्गाचे पुनर्रेखांकन आता केगद-कुंभवडेतून तळकट, झोळंबेमार्गे डेगवे-बांदा अशा अतिसंवेदनशील आणि जैवविविधतेने नटलेल्या भागातून करण्याचे निश्चित झाले आहे. मात्र, या प्रस्तावित मार्गामुळे कोकणातील अमूल्य वनसंपदा आणि दुर्मिळ वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त करत चिंता व्यक्त केली आहे.
डॉ. परुळेकर यांनी म्हटले आहे की, ज्या भागातून हा महामार्ग जाणार आहे तिथे असंख्य मोठमोठ्या वृक्षांची बेसुमार तोड केली जाण्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. कालच सरमळे गावात अतिशय दुर्मिळ अशा 'किंग कोब्रा' (नागराज) या सापाचे दर्शन घडले. तर काही दिवसांपूर्वी तळकट येथेही असाच दुर्मिळ नागराज आढळला होता. ज्या भागात किंग कोब्रासारखी प्रजाती आणि पट्टेरी वाघ, बिबट्या, हत्ती, गवे यांसारख्या वन्यजीवांचा वावर आहे, तिथे पर्यावरणाचा समतोल बिघडवून महामार्ग बांधणे कितीपत शहाणपणाचे आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. "किंग कोब्रा सारखा नागराजांचे दर्शन वारंवार घडणे हा निसर्गाचा कोणता संकेत आहे?" असा प्रश्न विचारत त्यांनी टोला लगावला की, "अघोरी विद्या आणि भोंदू बाबांच्या मागे लागणाऱ्या सत्ताधाऱ्यांना हे निसर्गाचे आणि ईश्वराचे संकेत कळणार आहेत का?" महामार्गाच्या निमित्ताने होणारी वृक्षतोड आणि वन्यजीवांच्या अधिवासावर होणारे आक्रमण यांमुळे स्थानिक जनतेमध्येही आता संतापाचे वातावरण आहे. पर्यावरणाचा हा ऱ्हास भविष्यात मोठ्या संकटांना निमंत्रण देणारा ठरू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.











