
सावंतवाडी : कणकवली पोलीस ठाण्यापासून जेमतेम 100 मीटरवर असलेल्या कणकवली - आचरा रस्त्यावरील ८ दुकाने चोरट्यांनी फोडलेली घटना ताजी असताना याच चोरट्यांनी सावंतवाडीच्या भर बाजारपेठेतील ६ दुकाने फोडली आहेत. दुकाने फोडताना चोरटे अनेकांच्या सीसीटीव्हीमध्ये जेरबंद झाले असल्याने कणकवली आणि सावंतवाडीतील चोरटे हेच दोघे असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
कणकवलीत शनिवारी पहाटे रस्त्यावरील ८ दुकाने फोडून चोरी केल्यानंतर थेट सावंतवाडी गाठत त्यांनी मुख्य बाजारपेठेतील ६ दुकाने फोडली आहेत. यातील दोन दुकानांतील रोकड त्यांच्या हाती लागली असून इतर ठिकाणी चोरीचा डाव फसला आहे. मात्र, भर वस्तीच्या ठिकाणी चोरांनी ६ दुकानं फोडल्याने शहरात भितीच वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती समजतात सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यात दुकानाची शटर हत्यारांनी उचकटलेली तर काही दुकानांच्या शटरची कुलपे फोडलेली असल्याचे आढळले. तसेच श्वानपथकाला देखील पाचारण करत तपासाची चक्रे फिरवली आहेत. दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेले चेहरे बघता कणकवली आणि सावंतवाडीत चोरी करणारे चोरटे एकच असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या चोरांच्या मुसक्या आवळण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.











