
सावंतवाडी : जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान राबविण्यात येत असून, सावंतवाडी तालुक्यातील महसूल मंडळ क्षेत्रफळ अंतर्गत येणारी गावे क्षेत्रफळ, इन्सुली, कुंभार्ली, वेत्ये, निगुडे, रोणापाल, शेर्ले, कास या गावांसाठी ग्रामपंचायत वेत्ये इथं बुधवार २५ मार्चला सकाळी १० ते सांय. ४ या वेळेत महाराजस्व समाधान शिबीर होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व सेवांचा लाभ जनतेला एकाच छताखाली मिळावा व या निमित्ताने महसूल यंत्रणा प्रत्येक गावापर्यंत पोहचावी या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान राबविण्यात येत आहे.
या शिबिरामध्ये प्रामुख्याने उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, जातीच्या दाखला, रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजना, पी. एम. किसान, तसेच महसूल विभागाशी संबधित विविध दाखल्यांचे वितरण या शिबिरात होणार आहे. या शिबिरात सहभागी होऊन संबधित सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन महसूल विभागाकडून करण्यात आलं आहे.










