
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा बंदरे व मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून उद्या, मंगळवार दिनांक २४ मार्च २०२६ रोजी सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात भव्य 'मेगा मेडिकल स्पेशालिटी तपासणी शिबिराचे' आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात विविध गंभीर आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला आणि उपचार मिळणार आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग आणि विविध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडणार आहे. प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या सहकार्याने हे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात खालील तज्ज्ञांमार्फत रुग्णांची मोफत तपासणी केली जाईल.हृदयरोग, कर्करोग (ऑन्कोलॉजिस्ट) आणि न्यूरॉलॉजी तज्ज्ञ.
स्त्रीरोग, बालरोग आणि बाल अस्थिरोग तज्ज्ञ.
युरॉलॉजी, फुफ्फुसरोग (पल्मनॉलॉजिस्ट) आणि त्वचा रोग तज्ज्ञ.
नेत्रचिकित्सा, दंतचिकित्सा आणि जनरल मेडिसिन.
तपासण्या: एक्सरे, सिटीस्कॅन, सोनोग्राफी, टू-डी इको, ईसीजी आणि रक्त लघवीच्या सर्व प्रयोगशाळा तपासण्या मोफत केल्या जातील.
शालेय मुलांची विशेष तपासणी देखील केली जाणार आहे.
योजनांचे लाभ आणि कार्ड सुविधा:
केवळ तपासणीच नव्हे, तर शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती देण्यासाठी आणि कार्ड काढण्यासाठी विशेष कक्ष उभारण्यात आले आहेत. यामध्ये:
आयुष्मान कार्ड
वय वंदना कार्ड (ज्येष्ठ नागरिकांसाठी)
आभा (ABHA) कार्ड
ही कागदपत्रे शिबिराच्या ठिकाणीच तयार करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
वेळ आणि ठिकाण: स्थळ: उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी. दिनांक: मंगळवार, २४ मार्च २०२६ वेळ: सकाळी ९:०० ते सायंकाळी ३:०० वाजेपर्यंत.
जास्तीत जास्त नागरिकांनी, रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी आणि उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीच्या कर्मचारी वृंदाने केले आहे.










