गॅस टंचाईवर बायोगॅसचा उतारा

कुडाळ तालुक्यात २२ संयंत्रे पूर्ण, 'भगीरथ'चा मोठा वाटा
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: March 23, 2026 21:56 PM
views 49  views

कुडाळ : सध्या घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमती आणि तुटवडा यामुळे ग्रामीण भागातील गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. अनेक ठिकाणी पुन्हा 'चूल' पेटवण्याची वेळ आली असतानाच, कुडाळ तालुक्यात बायोगॅस (जैववायू) हा एक उत्तम पर्याय म्हणून समोर येत आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात तालुक्यात २२ बायोगॅस संयंत्रांचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले असून, यामध्ये 'भगीरथ प्रतिष्ठान'चे योगदान मोलाचे ठरले आहे.

बायोगॅस उभारणीसाठी शासनाकडून आणि विविध संस्थांकडून प्रोत्साहन दिले जात आहे. सेस (SES) अनुदान: मागील वर्षी १८ बायोगॅससाठी प्रत्येकी १४३५० रुपयांचे अनुदान देण्यात आले. या कार्यात भगीरथ प्रतिष्ठानकडून ५,००० रुपयांचा 'सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंड' (CSR) मदत म्हणून दिला जातो. केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर बायोगॅस उभारणीसाठी लागणारे कुशल गवंडी देखील प्रतिष्ठानमार्फत पुरवले जातात.

कुडाळ तालुक्यातील हिर्लोक , निवजे या गावात बायोगॅसचा वापर सर्वाधिक प्रमाणात केला जात आहे. या गावात बायोगॅसची मागणी आणि लोकांचा प्रतिसाद वाखण्याजोगा असून, इतर गावांसाठी हे गाव आदर्श ठरत आहे.

तज्ज्ञांच्या मते, बायोगॅस हे केवळ इंधन नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे साधन आहे: दीर्घकालीन बचत: बायोगॅसचा खर्च केवळ बांधकामापुरता मर्यादित असून, एकदा उभारणी झाली की अनेक वर्षे मोफत इंधन मिळते.

क्षमतेचा वापर: एका बायोगॅस संयंत्राद्वारे ३ ते ५ व्यक्तींचे जेवण सहज बनवता येते.पशुधनाला चालना: बायोगॅससाठी शेणाची आवश्यकता असल्याने शेतकऱ्यांचा पशुपालनाकडे कल वाढत आहे, ज्यामुळे दुग्ध व्यवसायालाही चालना मिळत आहे.

पर्यावरणपूरक: लाकूड फाट्याचा वापर कमी झाल्याने धुरापासून मुक्ती आणि इंधन बचत होत आहे. एकूणच, वाढत्या महागाईच्या काळात बायोगॅसकडे वळणे ही काळाची गरज बनली आहे.