
दोडामार्ग : गोवा सीमेवर वारंवार वावर करणाऱ्या ‘ओंकार’ हत्तीला परतवण्यासाठी गोवा वनविभागाने थेट महाराष्ट्र हद्दीत प्रवेश करून कळणे गावात केलेल्या कारवाईमुळे सोमवारी सायंकाळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. विशेष म्हणजे महाराष्ट्र वनविभागाच्या उपस्थितीतच हा प्रकार घडल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘ओंकार’ हा हत्ती गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र-गोवा सीमेवर सतत फिरत आहे. शनिवारी मध्यरात्री तो गोव्यात गेला होता, रविवारी पुन्हा महाराष्ट्रात परतला आणि सोमवारी पुन्हा गोव्याच्या दिशेने गेला. यावेळी गोवा वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांचे पथक हत्तीला परतवण्यासाठी सक्रिय झाले.
या पथकाने हत्तीला गुळ, केळी, ऊस व इतर फळे खाऊ घालत त्याला आकर्षित करून हळूहळू महाराष्ट्राच्या दिशेने वळवण्याची शक्कल लढवली. फोंडिये मार्गे पुढे सरकत हे पथक सायंकाळी सुमारे ५ वाजता कळणे येथे दाखल झाले. मुख्य रस्त्यालगत हत्ती आल्याची माहिती मिळताच मोठी गर्दी जमली.
मात्र, प्रत्यक्षात गोवा वनविभागाचे अधिकारी महाराष्ट्रात येऊन हत्तीला तिलारीच्या दिशेने पिटाळत असल्याचे पाहून ग्रामस्थ अचंबित झाले. यावेळी उपस्थित महाराष्ट्र वनविभागाचे कर्मचारी मात्र शांतपणे पाहत असल्याने संताप व्यक्त करण्यात आला.
ग्रामस्थांनी तत्काळ आक्षेप घेत गोवा अधिकाऱ्यांना तुम्ही कोणत्या अधिकाराने महाराष्ट्रात कारवाई करता आहात, असा सवाल केला. यावर गोवा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी “स्थानिक वन अधिकाऱ्यांच्या समन्वयानेच ही कारवाई सुरू आहे,” असा दावा केला. मात्र अधिकृत आदेश दाखवण्याची मागणी होताच त्यांनी मौन बाळगले. परिस्थिती चिघळू लागल्याने आणि स्थानिकांचा विरोध वाढल्याने अखेर गोवा वनविभागाच्या पथकाने माघार घेतली. त्यानंतर कळणे येथील तणाव निवळला.
.. तर जाऊ शकतो पुन्हा बळी? - गोवा वनखात्याचे कर्मचारी ओंकार ला आपल्या मर्जी प्रमाणे पुढे आणण्यासाठी बाजारतील गुळ-केळी खायला देण्याच्या प्रकारावर ग्रामस्थांची नाराजी व्यक्त केली.
सध्या ओंकार हत्ती काही प्रमाणात माणसाळलेला दिसत असला तरी तो कधीही आक्रमक होऊ शकतो, यापूर्वी त्याने मोर्ले येथे एका शेतकऱ्याला ठार सुद्धा केलेलं आहे. त्यामुळे पुन्हा तो कधीही आक्रमक होऊ शकतो अशी भीती व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत गुळ, केळी देऊन त्याला आकर्षित करणे हा जीवघेणा प्रकार असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.
“हत्तीला गुळाची सवय लागल्यास तो भविष्यात अन्नाच्या शोधात थेट लोकवस्तीत येऊ शकतो. त्यामुळे जीवितहानीचा धोका वाढेल,” असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
दरम्यान, दोडामार्ग सिंधुदुर्ग वनविभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तर दोडामार्ग मधील ओंकार हत्ती सह सर्वच हत्ती समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आपल्याच दोडामार्ग टीमला जिल्हा उपवनसंरक्षक यांनी हत्ती इतकंच बळ देणं आवश्यक आहे.










